उत्तर प्रदेशातील हापूर जिल्हा हादरला, वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकशी भीषण धडक; 6 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बस आणि ट्रक यांच्यात धौलाना-गुलावती महामार्गावर समोरासमोर जोरदार धडक झाली.
Fatal accident involving bus and truck in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बस आणि ट्रक यांच्यात धौलाना-गुलावती महामार्गावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये मोठ्या संख्येने लग्नसमारंभासाठी जाणारे पहाहुन प्रवास करत होते. मध्यरात्रीच्या सुमारास वेगात आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की, बस आणि ट्रक दोन्हींचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले आणि मदतकार्याला सुरूवात केली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी आणि स्थानिक ग्रामस्थ्यांनी मिळून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही प्रवासी सिटीमध्ये अडकले होते, तर काहींना बाहेर काढण्यासाठी बसचे दरवाजे आणि काचा तोडाव्या लागल्या.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक ज्ञानंजय सिंह यांनी सांगितले की, अपघात इतका गंभीर होता की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय सात जण गंभीर जखमी असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख पटलेली नसून प्राथमिक तपासात हा अपघात वेग आणि निष्काळजीपणामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर अपघातग्रस्त वाहनांचे अवशेष विखुरले होते. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रक आणि बस रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक सुरळीत केली. सुमारे काही तासांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, अपघातानंतरचे भयावह दृश्य काही प्रत्यक्षदर्शींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. व्हिडिओमध्ये वाहनांचा चुराडा, जखमींच्या आर्त हाका आणि सुरू असलेले बचावकार्य स्पष्टपणे दिसत आहे. या दृश्यांनी अपघाताची भीषणता अधोरेखित केली आहे.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून मृतांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. जखमींच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली असून काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेगमर्यादा, चालकांची दक्षता आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.