खान सरांच्या कोचिंग संस्थेबाहेर अज्ञातांचा गोळीबार, दोन दिवसांत कोचिंग सेंटर उडवून देऊ म्हणत हल्लेखोरांचा धुमाकूळ
खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पाटण्यात एकच खळबळ असून कोचिंग सेंटर बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली आहे.
Firing outside Khan sir’s coaching institute : देशातील प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पाटण्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केवळ गोळीबारच केला नाही, तर कोचिंग सेंटर बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक खान सर यांच्या ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ या कोचिंग संस्थेबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटण्यातील मुसल्लहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हवेत पाच ते सहा राउंड गोळ्या झाडल्या.
खान सर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच जाहीर झालेल्या बिहार पोलिस भरतीच्या निकालात त्यांच्या संस्थेतील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी यश मिळवले होते. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी संस्थेत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर कर्मचारी आणि विद्यार्थी थकलेले असतानाच काही अज्ञात व्यक्ती कोचिंग सेंटरबाहेर आल्या आणि त्यांनी तेथील लोकांना धमकावण्यास सुरुवात केली.
यावेळी संस्थेच्या सुरक्षारक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले. जखमी सुरक्षारक्षकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून निघताना “दोन दिवसांत हे कोचिंग सेंटर बॉम्बने उडवून देऊ” अशी उघड धमकी दिली. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आणि तेथून पळ काढला.
केरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्यता, राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी
या घटनेमागे स्थानिक कोचिंग माफियांचा हात असू शकतो, असा संशय खान सर यांनी व्यक्त केला आहे. कमी शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना यश मिळवून देणे काही व्यावसायिक कोचिंग संस्थांना खटकत असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करून संस्थेची प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
घटनेनंतर खान सर यांनी पाटणा प्रशासनाकडे कोचिंग संस्थेची आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, खान सर यांच्या संस्थेवर यापूर्वीही हल्ला झाला होता. १० मे २०१९ रोजी मुसल्लहपूर हाट येथील केंद्रावर अज्ञात व्यक्तींनी दोन देशी बॉम्ब फेकले होते. त्या घटनेत मालमत्तेचे नुकसान झाले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्या वेळीही कोचिंग माफियांवर संशय व्यक्त करण्यात आला होता.
खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणातील आरोपींना पोलिस किती लवकर अटक करतात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.