Election Result LIVE : पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक : फडणवीस

जम्मू-काश्मीर आणि हरियानामधील विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरू झाली. प्रत्येक घटनेचं लाईव अपडेट पहा लेट्सअप मराठीवर.

LIVE: हरियाणात काँग्रेसची जोरदार लाट, 57 जागांवर आघाडी; जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी ट्रेंडमध्ये

Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE :  जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील ९० विधानसभा मतदारसंघांसाठी आज मंगळवार (दि. ८ ऑक्टोबर)रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. २०१४ नंतर जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत पार पडल्या आणि त्यात ६३.४५ टक्के मतदान झाले, जे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नोंदवलेल्या ६५.५२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरम्यान, आपण प्रत्येक ठिकाणचा रिझल्ट पाहा लाईव्ह.

हरियाणातील ९० जागांवर मतदान संपल्यानंतर राज्यात नवीन सरकार कोणाचं येणार हे समजण्यासाठी आता उलटी गिनती सुरू झाली आहे. बहुतांश एक्झिट पोलने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. हरियाणात दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबाबतही चुरस सुरू झाली आहे.

 

 

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Oct 2024 05:31 PM (IST)

    हरियाणातील निकाल म्हणजे लोकशाहीचा पराभव : जयराम रमेश

    हरियाणात झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत झालेला हा परभव आम्ही स्वीकारू शकत नसल्याचे म्हटले आहे. हरियाणात लागलेला निकाल हा व्यवस्थेचा निकाल असून, लोकशाहीचा पराभव असल्याचे म्हटले आहे. येथील निवडणुकीचे निकाल कल्पनेपलीकडचे आहेत. 3 ते 4 जिल्ह्यांतून अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. जिथे आमचा विजय निश्चित होता, तिथे आमचा पराभव झाला, असा दावाही काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

  • 08 Oct 2024 05:24 PM (IST)

    जे हरियाणात घडलं, तेच महाराष्ट्रात घडेल - फडणवीस

    हरियाणात भाजपनं एकहाती मोठा विजय मिळवतं तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हरियाणात जे घडलं, तेच महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात पाहायला मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

  • 08 Oct 2024 05:07 PM (IST)

    रवींद्र रैना यांनी दिला भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

    रवींद्र रैना यांनी जम्मू-काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे नौशेरा येथील पराभवानंतर रवींद्र रैनाने राजीनामा दिला आहे. रवींद्र रैना नौशेरा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला आहे.

  • 08 Oct 2024 04:44 PM (IST)

    हरियाणात बहुमत, मुबंईत भाजपचा जल्लोष

    हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 90 पैकी 50 जागांवर आघाडी घेतल्यानंतर आता मुंबईमध्ये भाजपने जोरदार जल्लोष सुरु केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 08 Oct 2024 04:11 PM (IST)

    पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक : फडणवीस

    जम्मू-काश्मीरचा निकाल भारतातील लोकशाहीची मजबूती अधोरेखित करणारा असून, सर्वात महत्त्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पाकिस्तान जे सांगत होतं की, भारताने जम्मू-काश्मीरमध्ये सेनेच्या माध्यमातून कब्जा केलेला आहे. तिथे लोकशाही नाही. जम्मू-काश्मीर भारताचा भाग नाही, त्या ठिकाणी फेअर निवडणूक होऊ शकत नाही. मात्र, पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन दाखवली.

     

  • 08 Oct 2024 03:53 PM (IST)

    अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल विजयी

    हरियाणातील हिसार विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी विजय मिळवला आहे. सावित्री जिंदाल या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. त्यांची नेटवर्थ 4280 कोटी रुपये आहे.

  • 08 Oct 2024 03:36 PM (IST)

    बहुमत आम्हालाच मिळणार: माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा

    हरियाणा विधानसभा निवडणुकीत बहुमत आम्हाला मिळत आहे. आतापर्यंत अनेक जागा आम्ही जिंकले आहे तर बऱ्याच जागांवर आम्ही आघाडीवर आहोत मात्र ते अपडेट होत नाही. अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आली आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की ठाम राहा, आम्हाला बहुमत मिळत आहे. असं माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा माध्यमांशी बोलताना म्हणाले.

  • 08 Oct 2024 02:12 PM (IST)

    ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री

    ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम मतदारसंघातून विजयी मिळवला असून,फारुख अब्दुल्ला यांनी पूर्ण निकाल हाती येण्याआधीच मुख्यमंत्री पदावर ओमर अब्दुल्ला विराजमान होतील अशी मोठी घोषणा केली आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, आम्हाला आशा आहे की आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू आणि त्यांचे प्रश्न सोडवू. जनतेने आमचे ऐकले आणि आमच्यावर विश्वास ठेवला याबद्दल त्यांनी आभारीही  मानले. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुभाव वाढवायची असल्याचेही फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

     

  • 08 Oct 2024 01:25 PM (IST)

    विनेश फोगटनं राजकीय कुस्ती जिंकली; भाजप उमेदवाराला केलं चितपट

    भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगटनं राजकीय कुस्तीच्या आखाड्यात बाजी मारत विजय मिळवला आहे. फोगटनं भाजप उमेदवार असलेल्या योदेश बैरागींवर मात केली आहे.  विनेशने 6015 मतांनी विजय मिळवला आहे. जुलाना मतदारसंघातून विनेशनं हा विजय मिळवला आहे.

  • 08 Oct 2024 01:03 PM (IST)

    काश्मीर खोऱ्यात काँग्रेस अन् भाजपचे दोन-दोन उमेदवार विजयी

    जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या चार जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार दोन तर भाजपचे उमेदवार दोन ठिकाणी विजयी झाले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नझीर अहमद खान गुरेझ एसटी जागेवरून तर सलमान सागर हजरतबलमधून विजयी झाले आहेत. तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. यामध्ये उधमपूर पूर्वमधून रणबीर सिंग पठानियान आणि बसोलीमधून दर्शन कुमार विजयी झाले आहेत. साडेबारा वाजेपर्यंत मतमोजणीच्या नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या असून जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला 52 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, भाजप 28, तर पीडीपीचे 8 उमेदवारी शर्यतीत पुढे आहेत.

  • 08 Oct 2024 12:49 PM (IST)

    भाजप माईंड गेम खेळतंय; साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबा

    काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. निवडणूक आयोग (Election Commission) मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप (BJP) सध्या आघाडीवर दिसत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असे जयराम रमेश यांनी म्हटले. तर, काँग्रेसने केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. ज्यात आयोगाने म्हटले आहे की, आम्ही लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. सर्व काही स्पष्ट आणि सर्वांसमोर आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला मतमोजणी प्रक्रियेचा फेरविचार करायचा असेल तर आमची हरकत नसल्याचे नमुद केले आहे.

     

  • 08 Oct 2024 12:45 PM (IST)

    2019 प्रमाणे पुन्हा हरियाणात एक्झिट पोल फेल; आतापर्यंतचा ट्रेंड काय?

    2019 च्या हरियाणा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला 61 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता तर, काही एक्झिट पोलने 75-80 जागा जिंकण्याचा अंदाजही वर्तवला होता. मात्र, हाती आलेले अंतिम निकाल पूर्णपणे वेगळे निघाले. यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेस बाजी मारेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. मात्र, यावेळीदेखील 2019 प्रमाणे एक्झिट पोलचे अंदाज फेल होताना दिसून येत आहेत.
    हरियाणातील आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार सर्व एक्झिट पोल अयशस्वी होताना दिसत आहेत. हाती येत असलेल्या ट्रेंडनुसार हरियाणामध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट चित्र असून, निकालाचा कल बदलला तर 2019 प्रमाणे राज्यातील एक्झिट पोल पुन्हा फोल ठरणार आहेत.

    भाजप 47 जागांवर आघाडीवर

    सध्यास्थितीत हरियामध्ये भाजपनं सरकार स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 46 ही मॅजिक फिगर गाठल्याचे दिसून येत आहे तर, काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर अन्य 7 जागांवर आघाडीवर आहे. निवडणुका पार पडल्यानंतर बहुतेक एक्झिट पोल्सने हरियाणात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला होता. ज्यात काँग्रेसला 55 तर भाजपला 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

    2019 मध्येही चुकले होते एक्झिट पोल

    2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत, एक्झिट पोलने भाजपला 61 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता तर, काही एक्झिट पोलने 75-80 जागा जिंकण्याचा अंदाजही वर्तवला होता. मात्र, निकाल एक्झिट पोलपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. 2019 मध्ये भाजपने 40 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला 31 जागा जिंकण्यात यश आले होते. सी व्होटरनेही भाजप 72 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता, तो चुकीचा ठरला.

    2024 च्या लोकसभा निवडणुकीतही एक्झिट पोल ठरले फेल

    नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वर्तवण्यात आलेले एक्झिट पोल फेल ठरल्याचे दिसून आले. बहुतेक एक्झिट पोल्सने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बंपर विजयाचा अंदाज वर्तवला होता. एनडीएला 361 ते 401 जागा मिळतील असा अंदाज असलेल्या बहुमताच्या आकड्यापेक्षा भाजप स्वबळावर जास्त जागा जिंकेल असाही अंदाज होता. मात्र, एक्झिट पोलचे निकाल चुकीचे ठरले. एनडीएला 293 तर भाजपला 240 जागा मिळाल्या.

  • 08 Oct 2024 12:15 PM (IST)

    जम्मूत भाजपने विजयाचं खात उघडलं

    हरियाणात एकीकडे काँग्रेसचा सुपडा साफ करत भाजपनं बहुमताकडे वाटचाल केली आहे. तरस तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये भाजपनं पहिला विजय मिळवत खातं उघडलं असूून, भाजपचे उमेदवार दर्शन कुमार यांचा 16 हजार 34 मतांनी विजय झाला आहे.

     

  • 08 Oct 2024 12:08 PM (IST)

    हरियाणात वारं फिरलं, भाजपाची मुसंडी; अडखळलेला शेअर बाजारही फुल्ल चार्ज!

    जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निकालात सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेस आघाडीवर होती. त्याचवेळी शेअर बाजाराची सुरुवातही अडखळत झाली होती. मात्र थोड्याच वेळात चित्रच पालटलं. हरियाणात पिछाडीवर पडलेल्या भाजपने जोरदार मुसंडी मारली. सध्याच्या परिस्थितीत भाजप 49 जागांवर आघाडीवर असून बहुमताचा आकडाही पार केला आहे. या घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर दिसला. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी तेजी आली.

    हरियाणात वारं फिरलं, भाजपाची मुसंडी; अडखळलेला शेअर बाजारही फुल्ल चार्ज!

     

  • 08 Oct 2024 11:35 AM (IST)

    पीडीपी प्रमुखांच्या मुलीने स्वीकारला पराभव

    जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहब्बूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी X वर पोस्ट करून जनतेने दिलेला कौ स्वीकरला आहे.बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी सदैव माझ्या पाठीशी राहील, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच निवडणूक काळात मेहनत घेणाऱ्या पीडीपी कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले आहे.

  • 08 Oct 2024 11:22 AM (IST)

    हरियाणात भाजपविरोधात लाट : संजय राऊत

    हरियाणात सुरूवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यानंतर आता मोठा उलटफेर होत भाजपनं आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. या निकालावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निकाल लागेपर्यंत हरियाणात अनिश्चितता कायम राहील. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी सांगितले आहे की, त्यांनी विजयासाठी सर्व तयारी आधीच करून ठेवली आहे. आता जरी हरियाणात काँग्रेस पिछाडीवर दिसत असली तरी, तेथे भाजपविरोधात लाट आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही भाजपचा पराभव होईल.

  • 08 Oct 2024 10:36 AM (IST)

    हरियाणातू आम आदमी पार्टी साफ, सर्वच मतदारसंघ पिछाडी

    हरियाणात अरविंद केजरीवालांची जादू चाललीच नाही. आम आदमी पार्टीने येथे भरपूर प्रयत्न केले. 88 जागांवर उमेदवार दिले. मात्र मतमोजणीत आप हरियणातून साफ होताना दिसत आहे. आम आदमी पार्टी एकाही मतदारसंघात आघाडीवर नाही.

  • 08 Oct 2024 10:35 AM (IST)

    LIVE: जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस बहुमताच्या दिशेने; 50 हून अधिक जागांवर पुढे

    Haryana Jammu Kashmir Assembly Election Result 2024 LIVE :  जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या काही तासांतच चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी आहे. भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख नेत्यांना केंद्रशासित प्रदेशात पुढील सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यांनी निवडणूकपूर्व युती केली होती. 90 सदस्यांच्या सभागृहात ते स्वबळावर 46 चा जादुई आकडा पार करतील असा दावा आघाडीने केला आहे.

  • 08 Oct 2024 10:27 AM (IST)

    हरियाणात भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धक्का

    हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Haryana Assembly Elections) सुरू आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर (Congress Party) होती. परंतु, थोड्याच वेळात येथील चित्र पूर्ण बदलले आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलांनुसार भाजप हरियाणात जवळपास 51 जागांवर आघाडीवर असून काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे.

  • 08 Oct 2024 09:17 AM (IST)

    जुलानामधून काँग्रेसच्या विनेश फोगाटची जोरदार आघाडी

    Haryana Assembly Elections 2024 : हरियाणातील जुलाना मतदारसंघातील हाय होल्टेज लढतीत काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट आघाडीवर असून भारतीय जनता पार्टीचे कॅप्टन योगेश बैरागी पिछाडीवर पडले आहेत.

    yogesh bairagi vinesh phogat

  • 08 Oct 2024 09:00 AM (IST)

    LIVE: हरियाणात काँग्रेसची जोरदार लाट, 57 जागांवर आघाडी; जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी ट्रेंडमध्ये

    Haryana and Jammu Kashmir Result : हरियाणाच्या विधानसभेच्या 90 जागांवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीसाठी राज्यात 93 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पक्ष 16 जागांवर आघाडीवर आहे. दुष्यंत चौटाला उचान कलानमधून पिछाडीवर आहेत. लाडवामधून नायब सैनी आघाडीवर आहेत.

  • 08 Oct 2024 08:47 AM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी आणि भाजपात कांटे की टक्कर..

    जम्मू आणि काश्मीर राज्यात सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस-एनसी आघाडी आणि भाजपात अटीतटीची लढत सुरू आहे. सध्याच्या आकडेवारीत भाजप काश्मीरात सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 75 जागांचे कल हाती येत आहेत. सध्या काँग्रेस आणि एनसी आघाडी 34 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 28 जागांवर आघाडी घेत घोडदौड करत आहे.

  • 08 Oct 2024 08:42 AM (IST)

    हरियाणात काँग्रेसची घोडदौड, 46 जागांवर आघाडी, भाजपाची पिछेहाट

    हरियाणात मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीची मात्र पिछेहाट झाली आहे. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत. त्यात काँग्रेस राज्यातील 42 मतदारसंघात आघाडीवर आहे. तर भाजपने 16 मतदारसंघांत आघाडी घेतली आहे. उचान मतदारसंघातून दुष्यंत चौटाला पिछाडीवर पडले आहेत. लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आघाडीवर आहेत.

  • 08 Oct 2024 08:04 AM (IST)

    हरियाणा, जम्मू काश्मिरात मतमोजणीला सुरुवात

    हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी सुरू आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

follow us