‘पुणे-मुंबई’ प्रवास 21 मिनिटात तुर्तास स्वप्नवतच! फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला नीती आयोगाचा ब्रेक

‘पुणे-मुंबई’ प्रवास 21 मिनिटात तुर्तास स्वप्नवतच! फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला नीती आयोगाचा ब्रेक

पुणे : भारतात सध्या ‘हायपरलूप’ (Hyperloop) हे तंत्रज्ञान शक्य नाही, भारतात हे तंत्रज्ञान अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारेही नाही, असे मत व्यक्त करत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी ‘हायपरलूप’ या येत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाला भारताची दारे बंद असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने ‘व्हर्जिन हायपरलूप’ तंत्रज्ञानाची उपयोगिता आणि ते आपल्याला परवडू शकते का? याचा अभ्यास करण्यासाठी सारस्वत यांच्या नेतृत्वात तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली होती. (head of the study committee hyperloop technology V.K. Saraswat said that is not possible in India)

दरम्यान, सारस्वत यांच्या या मतानंतर ‘पुणे-मुंबई’ प्रवास 21 मिनिटात हा ड्रीम प्रोजेक्ट तुर्तास स्वप्नवतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात फडणवीस सरकार सत्तेत असताना ‘व्हर्जिन हायपरलूप’ आणि’ डी. पी. वर्ल्ड कन्सोर्टियम’ या दोन कंपन्यांनी मुंबई ते पुण्यादरम्यान अशा प्रकारच्या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर केला होता, त्याबाबत करारही झाले होते. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाबाबत अनेक बैठकाही घेतल्या होत्या. हायपरलूप प्रकल्पाची चाचणी घेण्यासाठी त्यांनी अमेरिकेलाही भेट दिली.

महादेव बेटिंग अॅपसह 22 अॅपवर बंदी, ईडीच्या निवेदनानंतर केंद्र सरकारचा झटका

पण पुढे सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकल्प बारगळला होता. जगात अद्याप कुठेही या प्रकारचा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही, जेव्हा कुठे उभारला जाईल तेव्हा त्याबाबत विचार करण्यात येईल, असे महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. शिवाय या मार्गावर केंद्राकडून मुंबई-पुणे-हैद्राबाद द्रुतगती रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला गती येईल असे बोलले जात होते. पण आता त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लागल्याचे चिन्ह आहे.

सारस्वत म्हणाले, अनेक परकी कंपन्यांनी हे तंत्रज्ञान भारतामध्ये आणण्यात रस दाखविला आहे. पण हा पर्याय आपल्याला परवडणारा नाही. तंत्रज्ञान म्हणून जर विचार केला तरी या गोष्टी अद्याप अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्येच आहेत. त्यामुळेच आतापर्यंत आपण या तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व दिलेले नाही. आपल्यासाठी हा केवळ अभ्यासाचा घटक आहे. भविष्यामध्ये हायपरलूप आपल्या वाहतूक व्यवस्थेचा घटक बनेल असे मला तरी वाटत नाही,” असेही ते म्हणाले. त्यामुळे तुर्तास हायपरलूप हे तंत्रज्ञान भारतात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तब्बल 80 हजार कोटी पाण्यात! संपूर्ण धरणच नव्याने बांधण्याची केंद्रीय समितीची राज्याला सूचना

एलॉन मस्क यांची संकल्पना :

‘हायपरलूप’ ही एखाद्या कॅप्सूलच्या आकाराची हायस्पीड ट्रेन असून ट्यूबमधील पोकळीतून ती प्रचंड वेगाने धावू शकते. सर्वप्रथम एलॉन मस्क यांनी या तंत्रज्ञानाच्या वापराची संकल्पना मांडली होती. अमेरिकेतील लास वेगास येथे पाचशे मीटर ट्रॅकवर 9 नोव्हेंबर 2020 रोजी ‘व्हर्जिन हायपरलूप’ कडून रेल्वे चाचणी देखील घेण्यात आली होती. या चाचणीत काही प्रवाशी देखील सहभागी झाले होते त्यात काही भारतीयांचाही समावेश होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube