Video : प्रत्येक व्यवहारात वापरला जाणारा OTP सुरू कसा झाला?; वाचा भन्नाट स्टोरी…
History Of Bank OTP अनेक व्यवहार ओटीपी शिवाय पूर्णच होत नाहीत. पण बँकिंग व्यवहारांमध्ये ओटीपी वापरण्याची कल्पना नेमकी कुठून आली?
How OTP Start In Banking Transactions Know Story : आज ऑनलाइन पैसे पाठवायचे असोत, शॉपिंग करायची असो किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं असो… मोबाईलवर एक OTP येतोच! कधी कधी हा OTP यायला थोडा उशीर झाला, तरी आपली चिडचिड होते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की हा OTP सुरू तरी कसा झाला? आणि तो सुरू करण्याची कल्पना नेमकी कोणाला सुचली? तर, यामागे एक भन्नाट गोष्ट आहे. IIT मद्रासचे प्राध्यापक आणि उद्योजक डॉ. अशोक झुनझुनवाला यांनी ‘जिंदगी विद ऋचा’ या मुलाखतीत OTP सुरू होण्यामागचा किस्सा सांगितला आहे. जाणून घेऊया ही रंजक गोष्ट…
नव वर्षात मोठं संकटं घोंगावतंय?; घरात पुरेसं अन्न अन् रोकड ठेवा; ओपन लेटरनं खळबळं
तर, आजकाल आपण सगळेच ऑनलाइन व्यवहार करतो. कोणाला पैसे पाठवायचे असतील, बिल भरायचं असेल किंवा ऑनलाइन काही खरेदी करायची असेल, तर लगेच मोबाईलवर OTP येतो. तो टाकला की आपला व्यवहार पूर्ण होतो. पण ही सगळी सोय सुरू होण्यामागे एक वेगळीच गोष्ट आहे.
IIT मद्रासचे प्राध्यापक आणि उद्योजक डॉ. अशोक झुनझुनवाला यांनी ‘जिंदगी विद ऋचा’ या मुलाखतीत ही गोष्ट सांगितली. साधारण 2005 च्या आसपास बँकिंग व्यवहार डिजिटल कसे करता येतील आणि क्रेडिट कार्डमधून होणारी फसवणूक कशी रोखता येईल, यावर चर्चा सुरू होती. याच चर्चेतून मोबाईलवर SMS द्वारे एक कोड पाठवण्याची कल्पना पुढे आली.
डॉ. झुनझुनवाला यांनी मुलाखतीत बँकिंग व्यवहारांच्या खर्चाचं एक उदाहरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखादी व्यक्ती बँकेत जाऊन पैसे काढते, तेव्हा बँकेला साधारण 70 रुपयांपर्यंत खर्च येतो. ATM मधून पैसे काढण्यासाठी हा खर्च जवळपास 12 रुपये, तर क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास साधारण 2 रुपये खर्च असतो. म्हणजेच, डिजिटल व्यवहार बँकांसाठी तुलनेने स्वस्त होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी डिजिटल पेमेंटचा वापर करावा, असा विचार होता. पण यात एक मोठी अडचण होती. ती म्हणजे क्रेडिट कार्डची फसवणूकची…
कारण, समजा, तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती दुसऱ्या कोणाच्या हातात गेली, तर ती व्यक्ती तुमच्या कार्डचा वापर करून व्यवहार करू शकते. त्यामुळे बँकांसमोर फ्रॉड रोखणे हाच मोठा प्रश्न होता. यावर डॉ. झुनझुनवाला यांनी एक उपाय सुचवला. प्रत्येक वेळी क्रेडिट कार्डने व्यवहार करताना ग्राहकाच्या मोबाईलवर एक SMS पाठवायचा. त्यात एक कोड असेल आणि तो कोड टाकल्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही. म्हणजे कार्डची माहिती कोणाकडे गेली, तरी मोबाईलवर आलेला कोड नसल्यास व्यवहार करणं कठीण होईल आणि इथूनच OTP च्या कल्पनेला सुरुवात झाली.
परदेशात जाताना सिम कार्डची कटकट संपणार; WhatsApp वरूनच मिळणार eSIM
आता तुम्ही म्हणाल, मोबाईलवर SMS पाठवायचा, यात काय एवढं मोठं? पण 2025 च्या आसपास परिस्थिती आजच्यासारखी नव्हती. त्यावेळी SMS लगेच पोहोचेलचं याची खात्री नव्हती. शिवाय, एक SMS पाठवण्यासाठीही तुलनेने जास्त खर्च येत होता. त्यामुळे ही कल्पना प्रत्यक्षात आणणं सोपं नव्हतं.
डॉ. झुनझुनवाला यांनी सांगितलं की, त्यावेळी ते टाटा टेलिसर्व्हिसेसच्या बोर्डाशीही संबंधित होते. त्यामुळे त्यांनी टेलिकॉम कंपनीतील लोकांशी याबाबत चर्चा केली. SMS रिअल टाइममध्ये पाठवता येईल का? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर कंपनीच्या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या हे शक्य असल्याचं सांगितलं. त्यानंतर या कल्पनेवर पुढचं काम सुरू झालं.
आता सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे या कोडला OTP हे नाव कसं मिळालं? तर, डॉ. झुनझुनवाला यांनी मुलाखतीत सांगितलं की, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणीतरी या कोडला OTP असं नाव दिलं. OTP म्हणजे ‘वन टाइम पासवर्ड’. म्हणजेच एका वेळच्या व्यवहारासाठी वापरला जाणारा पासवर्ड. हळूहळू ही पद्धत डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाऊ लागली.
आज आपण अगदी सहज मोबाईलवर येणारा OTP टाकतो आणि आपला व्यवहार पूर्ण करतो. पण, 2025 च्या आसपास सुचलेली ही कल्पना आज कोट्यवधी लोकांच्या व्यवहारांमध्ये वापरली जाते. या छोट्याशा कोडमागे डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्याची मोठी कल्पना होती. साधारण 2005 च्या आसपास सुचलेली ही कल्पना आज आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी मोबाईलवर OTP आला, की त्यामागची ही रंजक कहाणी नक्की आठवा…