3 हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त अन् 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक ; तटरक्षक दलाची मोठी कारवाई

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई करत तब्बल 3 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. याचबरोबर या कारवाईत

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Indian Coast Guard

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई करत तब्बल 3 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. याचबरोबर या कारवाईत पाच पाकिस्तानी नागरिकांना देखील अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत लक्षद्विपजवळ एका इराणी बोटीला अडवले आणि त्यावरील पाच पाकिस्तानी तस्करांना ताब्यात घेतले.

बुधवारी, भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीपच्या (Lakshadweep) पश्चिमेस अरबी समुद्रात (Arabian Sea) अमली पदार्थांची तस्करी करण्याचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला. या मोहिमेदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 3000 कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तस्करीसाठी वापरण्यात आलेली बोट इराणी होती आणि त्यावर पाच पाकिस्तानी नागरिक होते.

पाच पाकिस्तानी नागरिक ताब्यात

तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, अडवलेली बोट, त्यावरील कर्मचारी आणि जप्त केलेले अमली पदार्थ पुढील चौकशी व कायदेशीर कार्यवाहीसाठी मुंबईत आणण्यात आले आहेत. ही मोहीम समुद्रात गुजरात ‘अँटी-टेररिझम स्क्वॉड’ (ATS Gujarat) च्या समन्वयाने राबवण्यात आली. तपासणीदरम्यान हेरॉईन आणि मेथाम्फेटामाइनसह एकूण 526 किलो अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई करताना गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने त्या संशयास्पद बोटीवर समुद्र आणि आकाश अशा दोन्ही ठिकाणांहून सतत पाळत ठेवली होती. त्यानंतर पथकाने बोटीचा पाठपुरावा केला आणि 25 सप्टेंबर 2026 रोजी त्या संशयास्पद इराणी बोटीला अडवून त्यावर प्रवेश केला. तटरक्षक दलाने म्हटले आहे की, ही कारवाई त्यांचे भक्कम पाळत ठेवण्याचे जाळे आणि सागरी क्षेत्रातील बेकायदेशीर कारवायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा त्यांचा निर्धार दर्शवते. तसेच, ही घटना भारताच्या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेबाबत तटरक्षक दलाची सतर्कता अधोरेखित करते.

follow us