Download App

250 रुपयात घेतलं लॉटरीचं तिकीटं अन् जिंकलं 10 कोटीचं बक्षीस; कचरा गोळा करणाऱ्या महिलांचं नशीब फळफळलं

  • Written By: Last Updated:

Lottery : आपल्या रोजच्या गरजा छोटी-मोठी काम करून भागवता येतात. पण त्याने हौस भागवता येत नाही अन् श्रीमंत होता येत नाही, अशी अनेकांची भावना असते. त्यामुळे बरेच लोक श्रीमंत होण्याच्या आशेने लॉटरीच्या तिकिटांवर पैसे खर्च करतात, परंतु तरीही त्यांना लॉटरी जिंकता येत नाही. मात्र, काही लोक अनपेक्षितपणे लॉटरी (Lottery) जिंकून करोडपती बनतात. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये (Kerala) घडला आणि 11 महिलांचे नशीब पालटले. (Kerala Sanitation Workers Buy Rs 250 Lottery Ticket Win Rs 10 Crore Grand Prize)

कचरा वेचणाऱ्या 11 महिलांनी पैसे पैसे जमा करून 250 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. या लॉटरीच्या तिकिटाने त्यांना आता सोनेरी दिवस दाखवले. त्यांना 250 रुपयांच्या लॉटरीच्या तिकिटावर 10 कोटी रुपयांचे पहिलं बक्षीस मिळालं आहे. स्थानिक नगरपालिकेच्या प्लास्टिक कचरा उचलणाऱ्या युनिटमध्ये काम करणाऱ्या या अकरा महिला कामगारांना स्वप्नातही वाटले नसेल की लॉटरीचं तिकीट त्यांच्यासाठी जॅकपॉट ठरेल. या11 महिलांनी एक एक रुपया जोडून लॉटरीचं तिकिट खरेदी केलं. 11 पैकी नऊ महिलांनी 250 रुपयांचे तिकीट खरेदी करण्यासाठी 25 रुपये जमा केले होते, तर इतर दोन महिलांनी 12.5 रुपये दिले होते.

संभाजी भिडेचा तत्काळ बंदोबस्त करा; ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांचा संताप 

बुधवारी जेव्हा लॉटरी लागल्याची बातमी पसरली तेव्हा हिरवे ओव्हरकोट आणि रबरी हातमोजे घातलेल्या 11 महिला पारप्पनगडी महापालिकेच्या गोदामात घराघरातून गोळा केलेला प्लास्टिक कचरा वेगळा करत होत्या.

केरळ लॉटरी विभागाने जाहीर केले की, महिलांनी पैसे जमा केल्यानंतर खरेदी केलेल्या तिकिटांना मान्सून बंपर म्हणून 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अडीचशे रुपयांचे लॉटरीचे तिकीट स्वत: एकट्यानं खरेदी करण्याची क्षमता या महिलांमध्ये नव्हती.

दरम्यान, लॉटरी विजेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी येथील महानगरपालिकेच्या गोदामाच्या आवारात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती

आनंदाला जागा नाही
पालिकेच कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्या मान्सून बंपर लॉटरीचं पहिलं पारितोषिक मिळाल्यानं त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. विजेत्यांपैकी एकजण असलेली राधा म्हणाली, गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी घरातून आणि ऑफिसमधून बायोडिग्रेडेबल न होणारा कचरा गोळा करण्याचं काम करतो. जेव्हा आम्हाला कळले की आम्ही जॅकपॉट लागला, तेव्हा आमच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावार उरला नाही. आपण सर्वजण जीवनात अडचणींचा सामना करत आहोत आणि हे पैसे काही प्रमाणात आमच्या समस्या सोडवण्यास मदत करतील.

परप्पनगडी नगरपालिकेने सुरू केलेल्या हरित कर्म सेनेच्या अंतर्गत काम करणाऱ्या या महिलांना त्यांच्या कामानुसार 7,500 ते 14,000 रुपये पगार मिळतो. हरित कर्म सेना घरे आणि आस्थापनांमधून नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा गोळा करते जो नंतर विविध युनिट्समध्ये पुनर्वापरासाठी पाठविला जातो.

नशिबाने साथ दिली
नगरपालिकेतील हरित कर्म सेनेचे अध्यक्ष शेजा म्हणाले की, यावेळी नशिबाने कष्टाळू लोकांना आशीर्वाद दिला आहे. हे सर्व पुरस्कार विजेते खूप मेहनती आहेत आणि त्यांच्या कुटुंबासाठी ते मोठ्या खस्ता खात आहेत. यातील अनेकांना कर्ज फेडायचं आहे, तर काहींना मुलींचं लग्न करायचं आहे किंवा आपल्या प्रियजनांच्या उपचाराचा खर्च भागवायचा आहे.

दुसऱ्यांदा एकत्र तिकीट घेतले
विशेष म्हणजे तिकीट खरेदीसाठी महिलांनी आपापसात पैसे गोळा करण्याची ही दुसरी वेळ आहे. विजेत्यांपैकी एक असलेल्या एका महिलेने सांगितले की, “गेल्या वर्षी अशाच प्रकारे पैसे गोळा करून आम्ही ओणम बंपर खरेदी केले आणि 7,500 रुपये जिंकले. ती रक्कम आम्ही आपापसात समान वाटून घेतली होती. यामुळे आम्हाला यावर्षी मान्सूनची बंपर तिकिटे खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळाले.”

Tags

follow us