मंत्र्यांच्या स्वागतासाठी हार घेऊन गेला अन् नेत्याची 7 लाखांची सोन्याची साखळी गायब, व्हिडिओ व्हायरल

मंत्र्यांना हार घालण्यासाठी गर्दीत गेलेल्या एका नेत्याच्या गळ्यातील 7 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी अचानक चोरीला गेल्याने खळबळ उडाली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 05T172219.907

Leader’s gold chain worth 7 lakh goes missing : नेत्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, हातात पुष्पगुच्छ आणि हार हे चित्र नेहमीच पाहायला मिळतं. मात्र बिहारमध्ये मंत्र्यांच्या स्वागतादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मंत्र्यांना हार घालण्यासाठी गर्दीत गेलेल्या एका नेत्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी अचानक गायब झाली. या साखळीची किंमत सुमारे 7 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

मुझफ्फरपूर दौऱ्यादरम्यान निशांत कुमार यांचा ताफा सकरी चौकात पोहोचला होता. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. अनेकांच्या हातात हार आणि पुष्पगुच्छ होते. याच गर्दीत मंडल हेदेखील मंत्र्यांना हार घालण्यासाठी पुढे गेले. या स्वागत सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

स्वागत सुरू असताना मंडल यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गायब झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र व्हिडिओमध्ये साखळी नेमकी कधी किंवा कोणी काढली, हे स्पष्टपणे दिसत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी कमी होऊ लागली तेव्हा मंडल यांनी गळ्याला हात लावला आणि साखळी नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित पक्षाच्या नेत्यांना आणि पोलिसांना याची माहिती दिली.

फडणवीस-शिंदेंच्या श्रेयवादात मराठा आरक्षण रखडलं; जरांगे पाटलांनी मोठा इशारा देत उपचार केले बंद

मंडल यांनी याप्रकरणी लेखी तक्रारही दिली आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने साखळी ओढून नेली असावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी धक्काबुक्कीमध्ये साखळी तुटून खाली पडली असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे साखळीची चोरी झाली की ती गर्दीत पडली, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. तक्रारीत कोणत्याही व्यक्तीचं नाव घेण्यात आलेलं नसून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. संधी साधून कोणीतरी यांची चैन पळवली, अशी मिश्किल कमेंट एका युजरने केली. तर “सोने घालून बाहेर पडाल तर हीच अवस्था होईल, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. काहींनी या घटनेवरून उपरोधिक प्रतिक्रिया देत नेत्याची फिरकी घेतली.

मंत्र्यांच्या स्वागतासाठी जमलेली गर्दी, त्यात गायब झालेली लाखोंची सोन्याची साखळी आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ यामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे. साखळी नेमकी चोरीला गेली की गर्दीत पडली, याबाबत आता पोलिसांच्या तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

follow us