कर्मचाऱ्यांना बिंदी लावण्याची परवानगी; ‘ड्रेस कोड’ वादावर Lenskart ने अखेर मागितली माफी
Lenskart Dress Code Controversy : ड्रेस कोड वादामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणारी लेन्सकार्ट कंपनीने आता या प्रकरणात
Lenskart Dress Code Controversy : ड्रेस कोड वादामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणारी लेन्सकार्ट कंपनीने आता या प्रकरणात स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. तसेच आता कंपनीसाठी नवीन स्टाईल गाईड देखील जारी केली आहे. या प्रकरणात कंपनीने स्पष्ट केले आहे की, कंपनीत कर्मचाऱ्यांना त्यांची धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीके परिधान करुन काम करण्याची परवानगी आहे.
कंपनीने (Lenskart) जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, कंपनीने ग्राहक आणि सर्वसामान्य जनता या दोघांनीही उपस्थित केलेल्या प्रश्न आणि चिंता काळजीपूर्वक ऐकून घेतल्या आहेत. जर त्यांच्या कोणत्याही पूर्वीच्या वक्तव्यामुळे किंवा धोरणामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल कंपनीला खेद आहे. कंपनी भारतात स्थापन झाली असून ती या देशातील लोकांची सेवा करते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक ओळखीशी तडजोड करण्याची सक्ती केली जाऊ नये.
नवीन स्टाइल गाइडलाइनमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, कर्मचाऱ्यांना बिंदी, टिळा, कुंकू, मंगळसूत्र, कडा, हिजाब आणि पगडी यांसारखी धार्मिक व सांस्कृतिक प्रतीके परिधान करण्याची परवानगी आहे. कंपनीने आश्वासन दिले की, भविष्यातील धोरणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम (मॉड्यूल्स) तयार करताना, या सर्वसमावेशक दृष्टिकोनालाच अग्रक्रम दिला जाईल.
ड्रेस कोडची नवीन स्टाइल गाइडलाइन काय ?
नवीन स्टाइल गाइडलाइनुसार, कर्मचाऱ्यांनी कंपनीने दिलेला टी-शर्ट, साधी गडद निळ्या रंगाची जीन्स आणि शूज परिधान करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, कडा, बांगड्या, मंगळसूत्र यांसारख्या सांस्कृतिक व धार्मिक वस्तू परिधान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना लहान आकाराचे कानातले, नाकातले नथ, हातातील अंगठ्या आणि गळ्यातील साखळ्या परिधान करण्याचीही मुभा आहे.
… तर विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारच; रोहित पवार स्पष्टच म्हणाले
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर कंपनीच्या कथित ‘ड्रेस कोड’बाबत प्रश्न उपस्थित केले गेले, तेव्हा या वादाची सुरुवात झाली. काही व्यक्तींनी असा आरोप केला की, कंपनी विशिष्ट धार्मिक चिन्हे वापरण्याची परवानगी देते, तर इतर चिन्हे वापरण्यास मात्र मनाई करते. त्यानंतर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीयूष बन्सल यांनी स्पष्ट केले की, ऑनलाइन प्रसारित होत असलेला तो दस्तऐवज कालबाह्य आहे आणि तो कंपनीच्या सध्याच्या धोरणाचे प्रतिनिधित्व करत नाही. तर दुसरीकडे हा वाद सुरु असताना ‘पोंगल’ सणाशी संबंधित एका जाहिरातीवरूनही कंपनीला टीकेचा सामना करावा लागला.