गल्ली-बोळातल्या भांडणात ईडीची धमकी, शरद पवारांनी उडवली भाजपची खिल्ली
Sharad Pawar on BJP : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा राज्यासह देशातील अनेक नेत्यांचा मागे लागला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agencies) गैरवापर होत असल्याची टीका विरोधक सातत्याने करत असतात. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही केंद्रीय तपास यंत्रणा आणि भापजवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज देशात ईडीचा (ED) गैरवापर होत आहे. विरोधकांमागे तपास यंत्रणा लावणं हे भाजपचं राजकारण आहे, अशी टीका पवारांनी केली.
‘माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या’; शरद पवारांनी अजितदादा गटाला ठणकावलं
आज दिल्लीत पक्षाच्या कार्यक्रमात बोलतांना पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, आज एजन्सीकडून विरोधातील काही लोकांना मुद्दाम त्रास दिला जात आहे. गाव-गावात आणि गल्ली-बोळात ईडी आणि सीबीआयची चर्चा सुरू असते. गावामध्ये दोघांमध्ये भांडणं झाल्यावरही ईडीची धमकी दिली जाते, इतक्या या तपास यंत्रणा चुकीच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, अशी खिल्ली पवारांनी उडवली.
ते म्हणाले, ईडीचा वापर महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही, तर अन्य राज्यात देखील हे चाललं आहे. आपच्या राज्यसभा सदस्याच्या घरावर सकाळी ७ वाजल्यापासून छापा टाकून त्यांना रात्री अटक करण्यात आली. आज सकाळपासून तामिळनाडूतील द्रमुक नेत्यांच्या घरांवर छापे टाकण्यात येत आहेत. पश्चिम बंगालमध्येही छापे टाकले जात आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना १३ महिने तुरुंगवास भोगावा लागला. नंतर काहीही सिद्ध झाले नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांना तुरुंगात टाकण्यात आले. का तर ते भाजपविरोधात लिहीत होते? भाजप सूड बुध्दीने ह्या कारवाया करत असल्याचं पवार म्हणाले.
ते म्हणाले, दहा वर्षांपूर्वीही ईडी संस्था होती. पण, अशी संस्था असल्याचं अनेकांना माहीत नव्हते. कारण, आजवर या तपास यंत्रणेचा अशाप्रकारे कधीच गैरवापर केला गेला नाही. सध्याचं भाजप सरकार विरोधकांना नमवण्यासाठी या यंत्रणेचा गैरवापर करत आहे. विरोधकांमागे तपास यंत्रणा लावणं हे भाजपचं राजकारण आहे. आज या तपास यंत्रणेचा फारच चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे, अशी टीका पवारांनी भाजपवर केली.
यावेळी बोलतांना त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. पंतप्रधान मोदी रेल्वे उद्घाटन करायला जातात आणि त्यांची रेल्वे ही विरोधी पक्षावर सुरू आहे. भोपाळला गेल्यावर भाषण दिलं की, राष्ट्रवादी पार्टी भ्रष्ट आहे. जर पार्टी भ्रष्ट आहे, तर चौकशी करा आणि जर खरं असेल तर कारवाई करा. मात्र, ज्यांच्याविरोधात आरोप केला, तेच आज राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत, असं पवार म्हणाले.