महिला आरक्षणाच्या वादात PM मोदींची एन्ट्री; आज रात्री देशाला संबोधन, वादळ शमणार की वाढणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी देशाला संबोधित करणार असल्याची अधिकृत माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
Prime Minister Modi will address the nation today : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात अपयश आल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी देशाला संबोधित करणार असल्याची अधिकृत माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणाऱ्या विरोधी पक्षांना महिलांविरोधात काम करणारे ठरवत त्यांना थेट जबाबदार धरले.
त्यांनी विरोधकांची भूमिका केवळ राजकीय चूक नसून सामाजिदृष्ट्या देखील गंभीर असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, विरोधकांचा महिलांविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन देशातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. ही केवळ संसदेतील लढाई नाही, तर विचारसरणीची लढाई आहे, असा सूर त्यांनी लावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, या भूमिकेमुळे विरोधकांना भविष्यात राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील त्यांनीही दिला.
एकट्या राहुल गांधींनी भाजपला कामाला लावलय; राऊतांचा भाजपवर थेट वार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी असे देखील म्हटले की, सध्या विरोधी पक्ष आपली भूमिका योग्य ठरवण्यासाठी स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, जनतेसमोर त्यांची भूमिका उघडी पडली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, आज रात्री होणाऱ्या पंतप्रधानांच्या राष्ट्राला संबोधनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भाषणात ते महिला सक्षमीकरण, राजकीय प्रतिनिधित्व आणि विधेयकाच्या अपयशामागील कारणांवर सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे.
तसेच, केंद्र सरकारची पुढील रणनीती काय असेल, याबाबत देखील संकेत मिळू शकतात. महिला आरक्षण विधेयक हे देशातील महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये अधिक प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल मानले जात होते. त्यामुळे या विधेयकावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.