सत्ताधारी भाजपला धक्का; राजस्थानच्या झेडपी, पंचायत समित्यांवर काँग्रेसचा झेंडा

Rajasthan Panchayat Samiti: काँग्रेसने पंचायत समितीच्या 2,463 जागांवर विजय मिळविला आहे, तर जिल्हा परिषदेच्या 66 जागांवर विजय मिळवला आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Rajasthan Zp Panchyat Samiti

Rajasthan Panchayat Samiti : राजस्थानमधील पंचायत समिती (Rajasthan Panchayat Samiti) आणि जिल्हा परिषद (Zila Parishad) निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसने पंचायत समितीच्या 2,463 जागांवर विजय मिळविला आहे, तर जिल्हा परिषदेच्या 66 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे, भाजपने पंचायत समितीच्या 1,512 आणि जिल्हा परिषदेच्या 25 जागा जिंकल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने (SEC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पंचायत समितीच्या एकूण 7,543 जागांपैकी आतापर्यंतच्या निकालांमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पंचायत समिती निवडणुकीत कोणाला किती जागा?
पंचायत समितीच्या 7,543 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. आतापर्यंत काँग्रेसने सर्वाधिक 2463 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 1512 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने (RLP) 354 जागा जिंकल्या आहेत. तर भारत आदिवासी पार्टीने 168 जागा जिंकल्या आहेत. सीपीआयने 43 जागा जिंकल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेस आघाडीवर
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्येही काँग्रेसने आघाडी कायम ठेवलीय. आतापर्यंत जाहीर झालेल्या 97 जागांच्या निकालांपैकी काँग्रेसने 66 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत.


चार जिल्ह्यांतील मतमोजणी पुढे ढकलली

राजस्थानमधील 41 जिल्ह्यांपैकी 37 जिल्ह्यांमध्ये पंचायत समितीच्या 7,543 आणि जिल्हा परिषदेच्या 1,275 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. मात्र, कोटा, बारां, करौली आणि श्रीगंगानगर या चार जिल्ह्यांमधील मतमोजणी 17 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांतील विद्यमान जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


मुख्यमंत्री भजनलाल शर्मांना स्वत:च्या जिल्ह्यातच धक्का

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा स्वत: च्या जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. भरतपूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. 31 जागांपैकी काँग्रेसने तब्बल 21 जागा जिंकल्या आहेत. भाजपला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले. तर एक जागा हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने (RLP) जिंकली आहे.

follow us