TMC तील बंड अधिक तीव्र; ममता गटाची याचिका फेटाळली, ऋतब्रत बॅनर्जीच राहणार बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते
विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय सध्या कायम राहणार असून ऋतब्रत बॅनर्जी हेच विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणार आहेत.
Ritabrata Banerjee will remain the Leader of the Opposition : पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मनाला जात आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय सध्या कायम राहणार असून ऋतब्रत बॅनर्जी हेच विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणार आहेत.
न्यायमूर्ती कृष्णा राव यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या याचिकाकर्त्यांच्या बाजूने अंतरिम दिलासा देण्यासारखा कोणताही ठोस आधार दिसत नसल्याचे नमूद केले.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने कोणताही अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. तसेच दोन्ही पक्षांना आपापली प्रतिज्ञानपत्रे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांत आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 जुलै रोजी होणार आहे.
ठाकरेंचे 6 खासदार फुटले; संसदीय बैठकीला दांडी मारून व्हिप उडवून लावला
नेमका वाद काय?
तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षातून हा वाद निर्माण झाला आहे. पक्षातून हकालपट्टी झालेल्या ऋतब्रत बॅनर्जी यांनी पक्ष नेतृत्वविरोधात बंद पुकारले होते. त्यांनी दावा केला होता की, त्यांना तृणमूल काँग्रेसच्या तब्बल ५८ बंडखोर आमदारांचा पाठिंबा आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली. हा गट ममता बॅनर्जी यांना गट नेता म्हणून मान्यता देत असला तरी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या अधिकारांना मान्यता देण्यास तयार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्पीकरांच्या निर्णयामुळे वाढला वाद
राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रथेंद्र बोस यांनी बंडखोर गटाचा दावा मान्य केला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शोभनदेब चट्टोपाध्याय यांच्याऐवजी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. याच निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी गटाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. स्पिकरांचा निर्णय अधिकृत राजकीय पक्षाच्या अधिकारांवर गदा आणणारा असून तो विधिमंडळाच्या नियमांना आणि घटनात्मक तत्वांना देखील विरोधात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
ठाकरे गटातील बंडखोरांचा ‘कॅप्टन’ ठरला?; परभणीचे ‘बंडू बॉस’ करणार फुटलेल्या खासदारांचे नेतृत्त्व
मात्र, उच्च न्यायालयाने स्पीकरांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने अंतिम निकाल लागेपर्यंत ऋतब्रत बॅनर्जी हेच पश्चिम बंगाल विधानसभेतील मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेते राहणार आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससमोरील अंतर्गत राजकीय आव्हाने आणखी तीव्र झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.