आमच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन; कॉमेडियन समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाची फटकारले; दंडही ठोठावला
Samay Raina-'इंडियाज गॉट लेटेंट' वादाशी संबंधित याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) वादाशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कॉमेडियन समय रैना (Samay Raina) न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी 3 लाख रुपयांचा दंडही त्याला ठोठाविण्यात आलाय. न्यायालयाने सुरुवातीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, रैनाच्या वकिलांनी सौम्य भूमिका घेण्याची विनंती करत शेवटची संधी देण्याची मागणी केल्यानंतर तो कमी करून 3 लाख रुपये करण्यात आला. त्याचवेळी पुढील सुनावणीपर्यंत न्यायालय समाधानी न झाल्यास 30 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान कठोर शब्दांत त्याला फटकारले. समय रैनाने न्यायालयाची दिशाभूल केलीय. आमच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन केले आहे. जर तुम्हाला तुमचे वर्तन सुधारता येत नसेल किंवा समाजातील लोकांच्या भावना समजून घेता येत नसतील, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाशी संबंधित याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया, आशीष चंचलानी आणि क्युअर एसएमए फाउंडेशन यांनी याचिका दाखल केल्या आहेत. सर न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने समय रैना आणि रणवीर अल्लाहबादिया यांना यापूर्वी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याबद्दल कडक शब्दांत सुनावले.
“युथ आयकॉन म्हणायचं तरी कसं?”
सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी न्यायालयात सांगितले की, “तो कसला युथ आयकॉन आहे, हेच समजत नाही. असा विचार केला तरी अंगावर शहारे येतात. त्यांनी आरोप केला की, न्यायालयाच्या आदेशानंतरही समय रैना सातत्याने कार्यक्रम करत आहे, मात्र त्याने एसएमए फाउंडेशन किंवा स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) ग्रस्त रुग्णांशी कोणताही संपर्क साधलेला नाही. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, “आपल्या देशातील तरुणांसाठी यापेक्षा खूप चांगले आदर्श आहेत.”
नव्या शोमधील कृतीवरही आक्षेप
तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, समय रैनाने नुकताच नवा शो सुरू केला असून त्याच्या सुरुवातीला त्याने “यावेळी मी मागच्या मालिकेत केले नव्हते, असे काहीतरी करतो,” असे म्हणत लिंबू-मिरची टांगली. त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी हा स्पष्ट संकेत असल्याचा दावा मेहता यांनी केला. त्यांनी असेही नमूद केले की, न्यायालयाच्या आदेशानंतरही समय रैनाने एसएमए फाउंडेशन किंवा संबंधित रुग्णांशी संपर्क साधलेला नसल्याने ही गंभीर बाब आहे.
न्यायालयाची कठोर टिप्पणी
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, समय रैनाने न्यायालयासमोर दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन केले आहे. तसेच, अनुपालन प्रतिज्ञापत्र (Compliance Affidavit) दाखल केल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र न्यायालयाच्या नोंदीत असे कोणतेही प्रतिज्ञापत्र उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने समय रैनाला 3 लाख रुपयांचा दंड दोन आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले. तसेच 15 दिवसांच्या आत अनुपालन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. ठरलेल्या मुदतीत प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला.