धर्म बदलला तर, SC आरक्षण संपणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे सविस्तर विश्लेषण

जे दलित आपला धर्म बदलून ख्रिश्चन किंवा मुस्लिम होतात आणि त्यांना जर अनुसूचित जातीचा (SC) दर्जा मिळाला, तर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात.

  • Written By: Published:
धर्म बदलला तर, SC आरक्षण संपणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे सविस्तर विश्लेषण

Supreme Court’s Big Verdict on SC Status And Conversion : भारतात जात आणि धर्म हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.24) धर्मांतर आणि आरक्षित प्रवर्गांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. ज्यात न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्माच्या लोकांनाच अनुसूचित जातीचा (SC) दर्जा दिला जातो आणि या प्रवर्गातील कोणत्याही व्यक्तीने हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त म्हणजेच मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले तर, कोणतीही दलित किंवा अनुसूचित जातीची व्यक्ती आपोआप आपला अनुसूचित जातीचा दर्जा गमावेल. हिंदू धर्माव्यतिरिक्त भारतात कोणत्या धर्मांना अनुसूचित जातीचा दर्जा दिला जातो. शिवाय, मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्या दलितांबद्दल धर्मांतराचा कायदा काय सांगतो? समजून घेऊया.

भारतात, अनुसूचित जाती आणि धर्मांतरासंबंधीचे नियम हा मोठ्या चर्चेचा विषय असतो. मंगळवारी म्हणजेच 24 मार्च 2026 रोजी न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणाऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. खंडपीठाने आंध्र प्रदेशातील एका खटल्यातील उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत वरील निकाल सुनावला आहे.

भारतात अनुसूचित जातीचा (SC) दर्जा कोणाला मिळतो?

भारतात, भारतीय संविधानाच्या कलम ३४१ अंतर्गत अनुसूचित जातीचा दर्जा दिला जातो. राष्ट्रपती एक यादी जारी करतात, ज्याला प्रेसिडेंशियल ऑर्डर असे म्हटले जाते. राज्यानुसार वेगवेगळ्या जातींचा अनुसूचित जातींमध्ये समावेश केला जातो आणि या यादीत केवळ संसदच दुरुस्ती करू शकते. सध्या, भारतीय संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५० नुसार, केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म मानणाऱ्यांनाच अनुसूचित जातीचा दर्जा दिला जाऊ शकतो. मूळतः, हा दर्जा केवळ हिंदूंसाठी होता, परंतु १९५६ मध्ये शिखांचा आणि १९९० मध्ये बौद्धांचा समावेश करण्यासाठी यात दुरुस्त्या करण्यात आल्या.

अनुसूचित जाती (SC) प्रवर्ग म्हणजे काय? त्यात कोणाचा समावेश होतो?

अनुसूचित जाती (SC) म्हणजे अशा जाती ज्यांना अस्पृश्यता, सामाजिक भेदभाव आणि आर्थिक मागासलेपणाचा सामना करावा लागला आहे. अनुसूचित जाती हा समुदायांचा एक गट आहे ज्यांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गाअंतर्गत कोणते लाभ मिळतात?

अनुसूचित जाती प्रवर्गाअंतर्गत फायदे आणि विशेषाधिकार आहेत. आरक्षणाबाबत बोलायचे झाल्यास लोकसभा आणि विधानसभेतील जागांवर आरक्षणाचा समावेश आहे. शिक्षण आणि रोजगारात सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमध्ये वयोमर्यादेत सवलत आणि जागांच्या कोट्याचा समावेश आहे. तसेच कायदेशीर संरक्षणांमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ अंतर्गत विशेष संरक्षणाचा समावेश आहे. याशिवाय कल्याणकारी योजनांमध्ये विशेष शिष्यवृत्ती, कमी व्याजदराची कर्जे आणि गृहनिर्माण योजनांचाही समावेश आहे.

हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांमध्ये अनुसूचित जाती आहेत का?

हे घटनात्मकदृष्ट्या वैध नाही. घटनेच्या अनुच्छेद ३४१ अंतर्गत जारी केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात (जसे की, मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्म) धर्मांतर करणारी व्यक्ती आपला अनुसूचित जातीचा दर्जा गमावते. मात्र, जर त्यांच्या समाजाचा त्या राज्याच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) यादीत समावेश असेल, तर त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला जाऊ शकतो.

मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्यांपैकी किती लोक अनुसूचित जाती प्रवर्गात येतात?

अधिकृत आकडेवारीनुसार, ही संख्या शून्य असून, केंद्र सरकारच्या अनुसूचित जाती (SC) यादीत मुस्लिम किंवा ख्रिश्चनांचा समावेश नाही. पण, मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांमधील अनेक जाती ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गांतर्गतून लाभ घेत आल्या आहेत.

संविधानानुसार धर्मांतरासंबंधी काय नियम आहेत?

भारतीय संविधानाच्या कलम २५ अन्वये, कोणताही धर्म मानण्याचे, त्याचे आचरण करण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य देते. आपला धर्म बदलणे हा एक वैयक्तिक अधिकार आहे. परंतु, धर्म बदलल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे सामाजिक आणि कायदेशीर हक्क बदलू शकतात. जसे की, अनुसूचित जातीचे आरक्षण हे एका विशिष्ट धर्माने सोसलेल्या ऐतिहासिक छळावर आधारित आहे.

धर्मांतरानंतरही अनुसूचित जातीचा दर्जा कायम राहतो का?

नाही. असे नाहीये की, धर्म बदलल्यानंतर अनेक दशकांपासून एक नियम स्पष्ट आहे की, ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारल्यास अनुसूचित जातीचा (SC) दर्जा संपतो, मात्र, जर अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला, तर त्याला पुन्हा अनुसूचित जातीचा (SC) दर्जा मिळू शकतो. पण यासाठी त्याच्या मूळ समाजाने त्याचा स्वीकार केलेला असावा ही एक महत्त्वाची अट आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या नियमातील बदलामागे काय कारण असू शकते?

जे दलित आपला धर्म बदलून ख्रिश्चन किंवा मुस्लिम होतात आणि त्यांना जर अनुसूचित जातीचा (SC) दर्जा मिळाला, तर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. यामुळे स्पर्धा वाढेल. अनुसूचित जातीच्या कोट्यात नवीन लोकसंख्या समाविष्ट होईल, ज्यामुळे सध्याच्या लाभार्थ्यांचा हिश्यावर परिणाम होऊ शकतो. राखीव जागांवर मुस्लिम आणि ख्रिश्चन उमेदवारांचा सहभाग वाढल्याने राजकीय बदलही दिसून येऊ शकतात. धार्मिक प्रभाव हा एक महत्त्वाचा घटक आहे. टीकाकारांच्या मते, यामुळे धर्मांतराला प्रोत्साहन मिळू शकते, तर समर्थकांचा युक्तिवाद आहे की धर्मांतराने सामाजिक गरिबी कमी होत नाही आणि म्हणूनच, त्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत.

संविधानानुसार समजून घ्या प्रकरण

संविधानांतर्गत असलेल्या अनुसूचित जाती आदेशाचा संदर्भ देत न्यायालयाने स्पष्ट केले की, संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५०, या बाबतीत पूर्णपणे स्पष्ट आहे. या आदेशाअंतर्गत लादलेली बंदी पूर्ण असून, १९५० च्या आदेशाच्या कलम ३ मध्ये नमूद न केलेल्या धर्मात धर्मांतर केल्यास, व्यक्तीचा जन्म कोणत्या जातीत झाला आहे याचा विचार न करता, त्या व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा तात्काळ संपुष्टात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, “कलम ३ च्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीचा सदस्य न मानली जाणारी कोणतीही व्यक्ती, संविधानांतर्गत, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यांतर्गत किंवा राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही अधिनियमांतर्गत कोणताही वैधानिक लाभ, संरक्षण, आरक्षण किंवा हक्काचा दावा करू शकत नाही. ही बंदी संपूर्ण आहे आणि तिला कोणताही अपवाद नाही. कोणतीही व्यक्ती कलम ३ मध्ये नमूद केलेल्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे पालन आणि आचरण करून एकाच वेळी अनुसूचित जातीचा सदस्य असल्याचा दावा करू शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आंध्रतील कोणत्या प्रकरणाच्या आधारावर देण्यात आला?

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आंध्र प्रदेशातील पाद्री चिंथडा आनंद यांनी दाखल केलेल्या अपिलावर देण्यात आला. अक्काला रामिरेड्डी आणि इतरांनी त्यांच्यासोबत जातीय भेदभाव आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आनंद यांनी केला होता. या प्रकरणाता आनंद यांनी अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत तक्रारदेखी दाखल केली होती. त्यानंतर रामिरेड्डी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. हरिनाथा यांनी एफआयआर रद्द करताना आनंद यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे त्यांनी अनुसूचित जातीचा दर्जा गमावला आहे त्यामुळे त्याला अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत संरक्षण मिळू शकत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आनंद यांच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असण्याने कोणताच फरक पडत नाही कारण, ख्रिश्चन धर्म जातीव्यवस्थेला मान्यता देत नाही आणि त्यामुळे आनंद यांचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात आल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाविरुद्ध आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते मात्र, सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळून लावली आहे.

follow us