जेएनयूमध्ये प्राध्यापकाविरोधात 11 विद्यार्थी पुढे; लैंगिक छळ आणि अतिरिक्त गुणांसाठी लैंगिक मागणी केल्याचा गंभीर आरोप

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एका विद्यार्थ्याने संबंधित प्राध्यापकाच्या कथित टिप्पणीबाबत एका अनधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती शेअर केली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 06T185354.623

Serious allegation of making sexual demands : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. विद्यापीठातील 11 विद्यार्थ्यांनी एका प्राध्यापकावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. हे प्रकरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या तोंडी परीक्षेशी (व्हायवा) संबंधित आहे. विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार, संबंधित प्राध्यापकाने व्हायवादरम्यान लैंगिक सूचक टिप्पणी केली. तसेच लैंगिक स्वरूपाची मागणी मान्य केल्यास अतिरिक्त गुण देण्याबाबत वक्तव्य केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एका विद्यार्थ्याने संबंधित प्राध्यापकाच्या कथित टिप्पणीबाबत एका अनधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती शेअर केली. त्यानंतर इतर अनेक विद्यार्थ्यांनीही पुढे येत संबंधित प्राध्यापकाविरोधात अशाच स्वरूपाचे आरोप केले. अशाप्रकारे एकूण 11 विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाविरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

मे महिन्याच्या अखेरीस हे प्रकरण विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे पोहोचले. त्यानंतर समितीने अनेक विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती आहे. तक्रारीनंतर विद्यापीठात सुमारे 45 दिवसांचा सेमिस्टर ब्रेक होता. जुलैच्या मध्यात वर्ग पुन्हा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली. मात्र, या आरोपांबाबत जेएनयू प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याचे वृत्त आहे.

मोशीत DJ च्या दणदणाटाने कुटुंब त्रस्त; आजारी वडिलांना घर सोडावं लागलं, अखेर मृत्यू, सोसायटीवर गंभीर आरोप

दरम्यान, जेएनयू विद्यार्थी संघटनेने विद्यापीठातील प्रयोगशाळांच्या कामकाजाबाबतही गंभीर आरोप केले आहेत. काही प्राध्यापक विद्यार्थ्यांना विनाकारण मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रयोगशाळेत काम करण्यास सांगतात, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे. प्रयोगशाळांची वेळ यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित करावी आणि रात्री उशिरापर्यंत काम करण्याबाबत संशोधक विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जेएनयूएसयूने सर्व विज्ञान प्रयोगशाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याचीही मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना धमकावणे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे आणि विद्यार्थी-पर्यवेक्षक यांच्यातील कथित दबावाच्या तक्रारींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व प्राध्यापकांसाठी लिंग आणि जात संवेदनशीलता कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या छळाच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे.

दिल्लीत मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची शक्यता

जेएनयूमध्ये यापूर्वीही प्राध्यापकांवर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. एप्रिल 2025 मध्ये विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले होते. त्यामध्ये स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधील वरिष्ठ प्राध्यापक स्वर्ण सिंग यांचा समावेश होता. जपानी दूतावासातील एका अधिकाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. चौकशीनंतर त्यांच्याविरोधात पुरावे आढळल्याचे सांगत कारवाई करण्यात आली होती.

सध्याच्या प्रकरणातील आरोप गंभीर असले तरी चौकशीचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे संबंधित प्राध्यापकावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. आता अंतर्गत तक्रार समितीच्या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि जेएनयू प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

follow us