शरद पवारांबरोबरच्या खासदारांचा वॉकआऊट; तटकरे विरोधी बाकावरच राहिले

  • Written By: Published:
शरद पवारांबरोबरच्या खासदारांचा वॉकआऊट; तटकरे विरोधी बाकावरच राहिले

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादी दोन्ही गटाची पहिली परीक्षा ही लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिसून आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असलेले एकमेव खासदार सुनील तटकरे हे सत्ताधारी बाकावर बसले नाहीत. ते शरद पवार गटातील चार खासदारांबरोबर विरोधी बाकावर बसले होते. पण मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. शरद पवारांबरोबर असलेले चारही खासदार सभागृहातून निघून गेले. परंतु तटकरे मात्र सभागृहातच बसून राहिले आहेत. (Sharad Pawar group MPs walk out of Lok Sabha, but Sunil Tatkare in house)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकसभेतील पाच खासदारांपैकी सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या गटात गेले. तर तर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि पी. पी. फैजल हे शरद पवारांसोबत होते. लोकसभेमध्ये आज अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार होते. त्यानंतर अविश्वास प्रस्वावावर मतदान होण्याची शक्यता होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आले. यात तटकरे यांचा व्हीप मोदी सरकारच्या बाजूने होता. तर पी. पी. फैजल यांचा सरकार विरोधात व्हीप जारी करण्यात आला होता.

PM Modi : राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ ला मोदींकडून नवं नाव म्हणाले, लूट का बाजार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या वेळी सुनील तटकरे हे विरोधकांच्या बाकावर बसलेले होते. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शेजारी बसूनच तटकरे हे भाषण एेकत होते. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या अगदी समोर बसल्या होत्या. परंतु पावणे दोन तासानंतरही पंतप्रधान हे मणिपूर मुद्द्यावर बोलत नव्हते. त्यामुळे विरोधकांनी मणिपूर बोलावे, यासाठी घोषणाबाजी सुरू केली. शेवटी विरोधकांनी सभात्याग केला. त्यात शरद पवारांबरोबर असलेले खासदार सभागृहातून निघून गेले. विरोधकांच्या बाकावर केवळ सुनील तटकरेच बसलेले होते. दोन्ही गटाने जारी केलेले व्हीप न पाळल्याबाबत काय कारवाई केली जाईल हे ही येत्या काही दिवसात समोर येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube