मुख्यमंत्रीपदाची सुत्र हाती घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच विजय स्टॅलिन यांच्या भेटीला, कारण काय?
तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे अखिल भारतीय आघाडीत फूट पडली आहे.
तामिळनाडूत सर्वाधिक जागा जिंकूनही थलपती विजय (Vijay) याच्या टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत होत्या. दोन ते तीन वेळेस राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊनही विजयला यश येत नव्हते. अखेरीस अन्य पक्षांनी पाठिंबा दिल्याचे पत्र दिल्यानंतर विजय यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आणि विजय याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर मात्र विजय यांनी स्टॅलिन यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर टीव्हीकेचे प्रमुख थलपथी विजय यांनी एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली. त्यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हेही उपस्थित होते. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेने निवडणुकीत डीएमकेला सत्तेबाहेर केले. स्टॅलिन शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसल्यामुळे तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री विजय त्यांना भेटायला गेले. परंतु, या भेटीने तामिळनाडूच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
‘कोणी डॉक्टर तर कोणी अभिनेता’; मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात या चेहऱ्यांचा समावेश
विजय हे तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना १३ मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. तामिळनाडूतील लहान पक्षांच्या पाठिंब्याने विजय मुख्यमंत्री बनले आहेत. यामध्ये काँग्रेस, व्हीसीके आणि आययूएमएल, तसेच सीपीआय आणि सीपीआय(एम) यांचा समावेश आहे.
दरम्यान, कोठलूरमध्ये पराभव झाल्यानंतर एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या मतदारसंघाला भेट दिली, जिथे ते भावूक झाले. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे अखिल भारतीय आघाडीत फूट पडली आहे. डीएमके काँग्रेसवर नाराज आहे. पक्षाच्या लोकसभा सदस्या कनिमोझी यांनी अध्यक्ष ओम बिरला यांना स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी करत पत्र लिहिले आहे.