राहुल गांधीआणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची खास भेट; नाश्त्याच्या टेबलवर रंगली चर्चा
18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली.
The Prime Minister of Malaysia met Rahul Gandhi : दिल्लीत सुरू असलेल्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या. तिघांनी एकत्र नाश्ता करत आंतराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा केली. मात्र, ही भेट नेमकी कुठे झाली, याबाबत माहिती समोर आलेली नाही. काँग्रेस तसेच अन्वर इब्राहिम यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीनंतर अन्वर इब्राहिम यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली.
आज सकाळी नाश्त्यावेळी माझे चांगले मित्र राहुल गांधी यांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली. आम्ही अलीकडील आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर आमचे विचार मांडले, असे त्यांनी म्हटले. या भेटीवेळी प्रियांका गांधीही चर्चेत सहभागी झाल्या. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांतील अन्वर इब्राहिम आणि राहुल गांधी यांची ही तिसरी भेट आहे. अन्वर इब्राहिम भारत दौऱ्यावर आले की राहुल गांधी यांच्याशी होणाऱ्या त्यांच्या भेटीने यापूर्वीही लक्ष वेधले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्यांच्या यापूर्वीच्या भेटींमधून दिसून आले आहे.
मोर्चात माणसं घुसवून मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप
राहुल गांधी आणि अन्वर इब्राहिम यांची पहिली भेट जानेवारी 2019 मध्ये नवी दिल्लीत झाली होती. त्यावेळी अन्वर इब्राहिम मलेशियाचे पंतप्रधान नव्हते, तर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी अन्वर भारतात आले असताना दोघांची भेट झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये मलेशियाचे पंतप्रधान म्हणून भारत दौऱ्यावर आलेल्या अन्वर इब्राहिम यांनी पुन्हा राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले होते. या भेटीनंतर अन्वर इब्राहिम यांनी गांधी कुटुंबाशी असलेल्या आपल्या संबंधांचा उल्लेख करत त्यांना ‘कौटुंबिक मित्र’ असे संबोधले होते. आता ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेली ही त्यांची तिसरी भेट ठरली आहे.
दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अन्वर इब्राहिम नवी दिल्लीत आले आहेत. शनिवारी त्यांनी ‘समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयता मजबूत करणे’ या विषयावरील सत्रात सहभाग घेतला. तसेच ब्रिक्स नेत्यांसोबत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला त्यांनी उपस्थिती लावली. या स्नेहभोजनातील अन्वर इब्राहिम यांचा एक वेगळा अंदाजही पाहायला मिळाला. त्यांनी पियानोच्या साथीने किशोर कुमार यांचे प्रसिद्ध हिंदी गाणे ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’ गायले. त्यामुळे राजनैतिक बैठकांच्या व्यस्त कार्यक्रमादरम्यान त्यांचा हा संगीतप्रेमी अंदाजही चर्चेचा विषय ठरला.
भारताकडून ब्रिक्स शिखर परिषदेचं दिमाखदार आयोजन; परिषदेतील ‘ही’ खास छायाचित्रं खूप काही सांगून जातात
दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी भारतात दाखल झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांच्या नेत्यांनी परिषदेत सहभाग घेतला. 12 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथे परदेशी नेत्यांचे स्वागत केले. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने विविध देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू असतानाच मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.