कर्नाटकमध्ये काँग्रेसचा भाजपाला झटका, बंडखोर माजी उपमुख्यमंत्र्यांना दिले तिकीट
Karnataka assembly elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 43 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. भाजपातून (BJP) बंडखोरी करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांना तिकीट मिळाले आहे. 43 उमेदवारांच्या जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत कोलार विधानसभा मतदारसंघातून केजी मंजुनाथ (KG Manjunath) यांनाही तिकीट देण्यात आले आहे. आता आणखी 58 जागांसाठी उमेदवार जाहीर करणे बाकी आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 43 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून पक्षात प्रवेश केलेल्या माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनाही स्थान दिले आहे. अथणी विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे भाजपात मतभेद ? ; बावनकुळेंचा विरोध, मुनगंटीवार म्हणाले, दौऱ्याला..
पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार केजी मंजुनाथ हे कोलार विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या विधानसभा निवडणुकीत वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. वरुणा विधानसभा मतदारसंघातून त्यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.
भाजपसोडून शुक्रवारी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथणी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. 6 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 41 उमेदवारांचा समावेश होता आणि एक उमेदवार सर्वोदय कर्नाटक पक्षाचा होता. सर्वोदय कर्नाटक पक्षाचे दर्शन पुट्टन्नैया यांना मेलुकोट विधानसभा मतदारसंघातून उमेदवार घोषित करण्यात आले आहे.