सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तिरुपरनकुंद्रम डोंगरावर ‘कार्तिगई दीपम’ प्रज्वलित; दीपस्तंभ उजळताच भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू!
Karthigai Deepam Thiruparankundram Hill Tamil Nadu: तिरुपरनकुंद्रम डोंगरावर 'कार्तिगई दीपम' प्रज्वलित करण्यात आला.
Karthigai Deepam Thiruparankundram Hill Tamil Nadu: तामिळनाडूतील मदुराईजवळ असलेल्या तिरुपरनकुंद्रम डोंगरावरील ‘दीपथून’ या पारंपरिक स्तंभावर अखेर कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर शनिवारी (28 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता हा दीप लावण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या दीपप्रज्वलनावरून वाद (Religious Dispute) सुरू होता. अखेर न्यायालयाच्या निर्देशानंतर दीप उजळल्याने भाविक आणि हिंदू संघटनांच्या (Hindu Organizations) सदस्यांनी आनंद व्यक्त केला. दीप प्रज्वलित होताच ढोल-ताशांचा गजर झाला, तर काही भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
दीपप्रज्वलनाचा सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक आणि हिंदू संघटनांचे सदस्य जमले होते. हा सोहळा कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडला. मात्र, या दीपप्रज्वलनामागे गेल्या काही दिवसांपासून नेमका काय वाद सुरू होता? मंदिर प्रशासनाने दीपथूनवर दिवा लावण्यास विरोध का केला होता? आणि सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप का करावा लागला? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
नेमका वाद काय होता?
तिरुपरनकुंद्रम हा डोंगर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या डोंगरावर मंदिरासोबतच सिकंदर बादुशा दर्गाही आहे. दर्ग्यापासून जवळपास 50 मीटर अंतरावर ‘दीपथून’ नावाचा दगडी स्तंभ आहे. याच स्तंभावर कार्तिगई दीपमची ज्योत प्रज्वलित करण्याची मागणी काही हिंदू संघटना आणि भाविकांनी केली होती.
मात्र, मंदिर प्रशासनाने या मागणीला विरोध केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून कार्तिगई दीपमची ज्योत उची पिल्लयार मंदिराजवळील पारंपरिक ‘दीपा मंडपम’मध्ये लावली जाते. हीच प्रचलित धार्मिक परंपरा असल्याचं मंदिर प्रशासनाचं म्हणणं होतं. त्यामुळे दीपथूनवर दिवा लावण्यास त्यांनी परवानगी दिली नाही.
लग्नाच्या नावाखाली महिलांची खरेदी-विक्री! तृप्ती भोईर यांचा ‘पारो’ चित्रपट उघड करणार भयावह वास्तव
दुसरीकडे, हिंदू संघटना आणि भाविकांनी दीपथूनवरच पारंपरिक पद्धतीने दिवा लावण्याची मागणी कायम ठेवली. हा स्तंभ दर्ग्याच्या जवळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी प्रशासनाचीही चिंता होती. याशिवाय, या दगडी स्तंभाच्या मूळ स्वरूपावरूनही मतभेद आहेत. काही सरकारी सर्वेक्षण अहवालांमध्ये हा स्तंभ ब्रिटिशकालीन सर्वेक्षणासाठी वापरला जाणारा मोजणीचा खांब असल्याचं म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाने दिले होते दिवा लावण्याचे निर्देश
या प्रकरणात मद्रास हायकोर्टाने दीपथूनवर दिवा लावण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकार आणि मंदिर प्रशासनाने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. 20 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने 24 नोव्हेंबरला दीपथूनवर दिवा लावण्यास एकदाच परवानगी दिली होती. मात्र, या परवानगीचा अर्थ त्या जागेवर कायमस्वरूपी धार्मिक किंवा पारंपरिक अधिकार मान्य केल्यासारखा होणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.
दिवा लावण्यासाठी मंदिर प्रशासनाने अधिकृत केलेल्या मर्यादित पथकाची नियुक्ती करावी आणि जिल्हा प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
24 नोव्हेंबरला दीपथूनवर दिवा का लावला नाही?
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही 24 नोव्हेंबर रोजी दीपथूनवर दिवा प्रज्वलित करण्यात आला नाही. त्या दिवशी उची पिल्लयार मंदिराजवळील पारंपरिक दीपा मंडपममध्ये संध्याकाळी सुमारे 6 वाजता दिवा लावण्यात आला. मात्र, दीपथूनवर दिवा न लावल्याने हिंदू संघटनांनी विरोध केला. या वेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.
मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, प्रशासनाने आवश्यक तयारी केली होती. मात्र, मंदिराच्या ट्रस्टी बोर्डाने दीपथूनवर दिवा लावण्यासाठी अधिकृत पथकाला परवानगी दिली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांना फटकारलं; ट्रस्टी बोर्डही निलंबित
या प्रकरणी दाखल अवमानना याचिकांवर शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी आधीच्या आदेशाचं पालन न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मंदिराच्या ट्रस्टी बोर्डाला निलंबित करण्याचे निर्देश देतानाच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अवमाननेच्या नोटिसा बजावण्यात आल्या.
मंदिर प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि व्ही. पार्थिबन यांची रिसीव्हर म्हणजेच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मंदिर आणि संपूर्ण डोंगर परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (CRPF) देण्यात आली.
अखेर 28 नोव्हेंबरला दीपथूनवर दीप प्रज्वलित
सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्देशांनंतर शनिवारी (28 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता दीपथूनवर कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादानंतर अखेर या स्तंभावर दीप उजळला. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दीप प्रज्वलित होताच परिसरात ढोल-नगारे वाजवण्यात आले आणि भाविकांनी आनंद व्यक्त केला.
बीडमध्ये प्राध्यापकाचा संतापजनक प्रकार! विद्यार्थिनीचा विनयभंग, नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप
दरम्यान, यंदा दीपथूनवर दिवा लावण्यास दिलेली परवानगी ही एकदाच लागू असलेली होती. त्यामुळे या जागेवरील कायमस्वरूपी धार्मिक किंवा पारंपरिक अधिकारांचा अंतिम निर्णय या आदेशातून झालेला नाही. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर यंदाचा कार्तिगई दीपम दीपथूनवर प्रज्वलित करण्यात आला आहे.