कोरियामध्ये भाजप नेते भारत सिंह यांच्यासह तिघांचा जिवंत जाळून खून, वाळू उत्खननाच्या वादातून घडले थरारक हत्याकांड

भाजपचे नेते आणि माजी पदाधिकारी भारत सिंह उर्फ लाला सिंह यांच्यासह तिघांचा कार पेटवून निर्घृण खून करण्यात आला.

  • Written By: Published:
Untitled Design 17

Three people, including BJP leader Bharat Singh, burned to death : छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे नेते आणि माजी पदाधिकारी भारत सिंह उर्फ लाला सिंह यांच्यासह तिघांचा कार पेटवून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील रेती उत्खननाचे कंत्राट भारत सिंह यांच्या कुटुंबाकडे होते, तर रेती वाहतुकीचे काम त्रिपाठी कुटुंबाकडे असलेल्या ट्रकद्वारे केले जात होते.

या व्यवसायातून आर्थिक व्यवहार आणि वर्चव्वाच्या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र वाद सुरू होता. मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भारत सिंह आपल्या सहकाऱ्यांसह फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी आधीच सापळा रचला होता. भारत सिंह यांची कार रस्त्यात अडवण्यासाठी पुढे आणि मागे ट्रक उभे करण्यात आले. कार पूर्णपणे घेरल्यानंतर हल्लेखोरांनी त्यावर पेट्रोल ओतून आग लावली.

उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला फसवत आहेत’; 6 नव्हे तर 7 खासदार फुटले होते, रामदास कदमांचा सनसनाटी दावा

या भीषण आगीत भारत सिंह यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले चुलत भाऊ नागेंद्र सिंह यांचा देखील मृत्यू झाला. तर वीरेंद्र सिंह यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मयांक सिंह यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर कोरिया जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अक्षत त्रिपाठी आणि विशाल त्रिपाठी यांचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कोरिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुरेश चौबे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून या संपूर्ण कटाचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. वाळू व्यवसायातील वर्चस्वाच्या संघर्षातून घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने छत्तीसगड हादरला असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us