Video : रेवती सुळेंचं रिसेप्शन दिग्गजांची मांंदियाळी अन् पवारांचा अचानक रत्नागिरीच्या तरूणाला इशारा
Revati Sule Reception पवारांनी रत्नागिरीच्या तरुणाला स्वतः मोदींकडे नेलं आणि ओळख करून दिली. पुढच्याच क्षणी त्या तरुणाने...
Sharad Pawar Introduce Ratnagiri Young Man In Revati Sule Wedding Reception : नातीचं रिसेप्शन… देशभरातील राजकीय दिग्गजांची उपस्थिती… पण या सगळ्या झगमगाटात शरद पवारांना मात्र एका खास तरुणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घडवून आणायची होती. रिसेप्शनमध्ये पवारांनी रत्नागिरीच्या या तरुणाला स्वतः मोदींकडे नेलं आणि ओळख करून दिली. पुढच्याच क्षणी त्या तरुणाने खिशातून मोबाईल काढला आणि थेट पंतप्रधानांना काहीतरी दाखवायला सुरुवात केली. मोदीही त्याचं म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकत राहिले. अखेर हा तरुण कोण, पवारांनी त्याची मोदींशी भेट का घडवून आणली आणि त्याने मोदींना मोबाईलमध्ये असं काय दाखवलं? याची उत्सुकता निर्माण झाली. हा तरुण आहे रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील युवा शेतकरी आणि उद्योजक मिथिलेश देसाई, ज्यांची ओळख ‘फणस किंग’ अशी आहे. त्यांनी या काही मिनिटांच्या भेटीत थेट पंतप्रधानांसमोर कोकणच्या फणसापासून उभ्या राहणाऱ्या शेती आणि व्यवसायाची कहाणी मांडली.
शरद पवारांनी करून दिली PM मोदींशी भेट
नात रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये मिथिलेश देसाई यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात शरद पवार यांनी स्वतः मिथिलेश यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख करून दिल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत मिथिलेश यांनी मोदींना आपल्या फणसाच्या शेतीतील प्रयोगांची माहिती दिली. फणसाच्या विविध जाती, त्यांचं संवर्धन, आधुनिक शेती, फणसापासून तयार होणारी मूल्यवर्धित उत्पादनं आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकणारं अतिरिक्त उत्पन्न, याबाबत त्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. मिथिलेश मोबाईलमध्ये काही माहिती आणि कागदपत्रं दाखवत असताना मोदी ती बारकाईने पाहत असल्याचं फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे.
UPSC सोडून देसाई थेट फणसाच्या शेतीत
मिथिलेश देसाई यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून कृषी अभियांत्रिकीमध्ये B.Tech. केलं आहे. शिक्षणानंतर त्यांनी दिल्लीमध्ये UPSCची तयारी सुरू केली. 2016 मध्ये ते दुसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचले; मात्र अंतिम निवड झाली नाही. यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेकडे जाण्याऐवजी आपलं कृषी शिक्षण शेतीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आणि वडिलांसोबत फणसाच्या शेतीवर काम करण्यास सुरुवात केली.
एका शेतात फणसाच्या 80 हून अधिक प्रजाती
मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांनी सुमारे 2000च्या आसपास केरळमधून फणसाच्या विविध जाती आणून लागवड सुरू केली होती. मिथिलेश यांनी या पारंपरिक शेतीला संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. आज त्यांच्या सुमारे 28 एकरांच्या शेतात फणसाच्या 70 ते 86 पेक्षा अधिक विविध जाती असल्याचं सांगितलं जातं. वेगवेगळ्या रंगांचा गर असलेल्या जातींपासून वर्षातून दोनदा फळ देणाऱ्या आणि कुंडीत वाढणाऱ्या फणसाच्या जातींपर्यंत त्यांनी अनेक प्रकार जतन केले आहेत.
मोदींना फणसापासून ‘व्हेगन मीट’पर्यंतची माहिती
मिथिलेश यांचा प्रयोग केवळ फणसाची लागवड करण्यापुरता मर्यादित नाही. त्यांच्या ‘JackfruitKing Agro Producer Company’च्या माध्यमातून फणसापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनं तयार केली जातात. यामध्ये व्हेगन मीट, बर्गर पॅटीज, चिप्स, पावडर आणि पशुखाद्य यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. त्यांच्या नर्सरीतून दरवर्षी सुमारे 25 हजार कलम केलेली फणसाची रोपं विकली जात असल्याचं सांगितलं जातं. या उपक्रमाशी 900हून अधिक शेतकरी जोडले असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.
मिथिलेश यांचा भर फणसाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करण्यावर आहे. फणसाच्या फळासोबतच बिया, पानं आणि इतर भागांचा विविध प्रकारे उपयोग करण्यावर संशोधन सुरू आहे. याशिवाय आंब्याच्या कोयी-साली, काजूची फळं आणि इतर कृषी अवशेषांचा वापर करून मूल्यवर्धित उत्पादनं तयार करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजेच शेतातील ‘कचरा’ फेकून न देता त्याचं अतिरिक्त उत्पन्नाच्या साधनात रूपांतर करण्याचं मॉडेल ते उभं करत आहेत.
‘फणस म्हणजे कल्पवृक्ष’
मिथिलेश फणसाला ‘कल्पवृक्ष’ मानतात. कारण फणसाचा केवळ गर खाण्यासाठीच नव्हे, तर त्याच्या विविध भागांचा अन्न, उद्योग आणि संशोधनासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे कोकणातील पारंपरिक फळाला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना ‘कृषी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आल्याचंही सांगितलं जातं. त्यांच्या उपक्रमातून फणसाची रोपं परदेशातही पाठवली जात असून, फणसाच्या पानांचा संशोधनासाठी जर्मनीत उपयोग होत असल्याची माहिती आहे.
राजकीय गप्पांपासून शेतीच्या चर्चेपर्यंत…
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये एकाच छताखाली देशातील अनेक मोठे राजकीय नेते उपस्थित होते. मात्र, या सगळ्या राजकीय चर्चांपासून दूर रत्नागिरीचा एक तरुण पंतप्रधान मोदींना आपल्या फणसाच्या शेतीची आणि कृषी व्यवसायाची माहिती देताना दिसला. मोदींच्या चेहऱ्यावरचा लक्षपूर्वक भाव आणि मिथिलेश यांच्या हातातील मोबाईलमधून सुरू असलेली चर्चा यामुळे याचे फोटो आणि व्हिडिओ चर्चेचा विषय ठरले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोकणातील शेती, फणस आणि त्यातून उभं राहणारं व्यवसायाचं मॉडेल थेट पंतप्रधानांसमोर मांडण्याची ही भेट अनेकांच्या नजरेत भरली.
View this post on Instagram