2022 धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष, सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे
मुंबई : ‘सरकारी यंत्रणांचा आजवर कधीही झाला नाही, असा गैरवापर करून देशात दहशत आणि भयाचे वातावरण सरत्या वर्षात निर्माण केले गेले. एका अर्थाने धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण. मावळत्या वर्षातील सरकारी दहशतवादाचा हा उच्छाद लोकशाहीचे तमाम स्तंभ उघडय़ा डोळय़ांनी पाहात राहिले. नव्या वर्षात तरी आंधळेपणाचा बुरखा पांघरलेली ही पट्टी सुटेल काय ?’ असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे-फडणवीस सरकारला करण्यात आला आहे.
‘विरोधी पक्षात असलेले सारेच नेते भ्रष्ट आणि तीच मंडळी ईडी वा सीबीआयच्या धाकाने सत्ताधाऱ्यांच्या छावणीत दाखल झाली की, धुऊन-पुसून स्वच्छ, अशी भलतीच व्याख्या सरत्या वर्षात सरकारने रूढ केली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे नको तेवढे व्यक्तिस्तोम माजवले जात असतानाच चीनने हिंदुस्थानात केलेल्या घुसखोरीपासून महागाई, बेकारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली अपमानास्पद घसरण, हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच. पुन्हा यावरून प्रश्न विचारेल त्यांना ब्लॅकमेलर्सचा वापर करून तुरुंगात डांबलेच म्हणून समजा.’ सामनातून अशी टीका केंद्र सरकारवरही करण्यात आली.
‘खरेदी केला किंवा धाकदपटशा दाखवून मुख्य प्रवाहातील साऱ्याच प्रसारमाध्यमांची तोंडे बंद केली. सरकारविरुद्ध बोलणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सरकारी यंत्रणांचा वाटेल तसा गैरवापर करून तुरुंगात डांबले, पण उशिरा का होईना वर्षाखेरीस न्यायालयात या सरकारी मुस्कटदाबीचे थोबाड फुटले.’
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये आज वर्षाच्या अखेरच्या दिवशी वर्षांतील राजकीय घडामोडींचा आढावा घेताना केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.