भाच्याच्या डबल गेमनंतर बाळासाहेब थोरात मौनात
अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमधील अंतर्गत कलह दिसून आला. अचानक काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपनेही अधिकृत उमेदवार दिला नाही. तर सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला आहे. एकीकडे स्वतः पक्षाला धक्का देणारे तांबे यांनी दुसऱ्या पक्षाकडे पाठिंबा मागणे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी तांबे कुटुंबाने दिलेला धक्का मानला जात आहे. त्यावर अद्याप तरी थोरात यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. काँग्रेसमध्ये या मतदारसंघातील उमेदवारीवरून गोंधळच होता. डॉ. सुधीर तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाळासाहेब थोरात हे गेले नव्हते. त्याचवेळी काही तरी गोंधळ असल्याची राजकीय शंका उपस्थित झाली होती. एकीकडे सत्यजित तांबे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना थोरात मात्र मुंबईत होते. अपघातात जखमी झालेले आमदार धनंजय मुंडे यांची त्यांनी भेट घेतली आहे. सत्यजित तांबे यांनी काँग्रेसला व थोरात यांना दिलेल्या धक्काला आता २४ तास झाले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजित तांबे पक्षाचे उमेदवार नाहीत. तांबे पितापुत्रांवर कारवाई करण्याचे संकेतही पटोले यांनी दिले आहेत. तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परंतु अद्याप काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अजूनही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. थोरात यांच्या प्रतिक्रियानंतर नेमके काय राजकारण घडले हे समोर येऊ शकते.