जन्माची अद्दल घडविणार; अजितदादांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदाराच्या पोटात गोळा

  • Written By: Published:
जन्माची अद्दल घडविणार; अजितदादांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदाराच्या पोटात गोळा

अहमदनगरः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेल्या धक्क्याची दखल अजित पवार यांनी घेतली आहे. कालच्या कर्जत येथील सभेत याबाबत अजित पवार बोलले आहेत. नुसते बोललेच नाही. तर कोणी शेण खाल्लं आहे, त्याला असा झटका देईल की त्याच्या दहा पिढ्याला लक्षात राहिल, असा सज्जड इशारा दिला आहे. अजित पवार हे कसा करेक्ट कार्यक्रम करतात हे राष्ट्रवादी, इतर पक्षातील नेत्यांना चांगलेच लक्षात आले. या इशाऱ्यामुळे माजी आमदाराच्या पोटात चांगलाच गोळा आला आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले हे अध्यक्ष झाले. तर राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे आठ आणि काँग्रेसचे सहा असे चौदा संचालक असताना घुले यांचा पराभव झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, कर्डिले यांनी अजित पवारांना धक्का दिला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाच संचालक फुटले होते. त्यात राष्ट्रवादीचे चार आणि एक काँग्रेसचा फुटल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. अध्यक्ष निवडीला गुप्त मतदान असले तरी कोण कोणाचा जवळ गेले आहे हे राष्ट्रवादीच्या नेत्याला माहित आहे. यावर कर्जत येथे पहिल्यांदाच अजित पवार हे बोलले आहेत.

धमक असेल तर काँग्रेसला सोडा, अभिनंदन करेन.., बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

आगामी काळात बाजार समित्या, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका आहोत, असे सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून फुटणाऱ्या संचालकांना सज्जड इशारा दिला आहे. जिल्हा बँकेची निवडणुकीत एक गोष्ट चुकीची घडली आहे. चौदा संचालक असताना आपला उमेदवार पराभूत झाला आहे. काही जण दिवसा आमच्याबरोबर होते. मतदानाच्या वेळी मात्र त्यांच्याबरोबर गेले आहेत. काय घडलंय, कोणी शेण खाल्ल्य हे सर्वांना माहित आहे. जिकडे जायचे तिकडे जा तुम्हाला अशी अद्दल घडवेल, दहा पिढ्या लक्षात ठेवतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार यांनी फुटीराचे नावे आपल्याला कळल्याचे जाहीरपणे सांगितल्याने त्याच्या पडसाद येत्या काही दिवसात दिसणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही मोठी बँक पक्षाला गमवावी लागली आहे. अध्यक्षपदासाठी अजितदादांनी नियोजन करून बैठक घेतली होती. मात्र घरातील भेदी निघाल्याचे पक्षाच्या उशीरा लक्षात आले. त्यातही माजी आमदारांसारख्या नेत्याने पक्षाशी गद्दारी केल्याने अजितदादांना राग अनावर झाल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला हा माजी आमदार लागला आहे. आता त्याचे तिकीट कट होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यासंबंधीत पक्षातंर्गत विरोधकांनी याबाबत सर्व माहिती नेत्याला कळवलेली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube