Ahmednagar Politics : कर्डिले पुन्हा ‘किंग’, मात्र ताकद विखेंची

  • Written By: Published:
Ahmednagar Politics : कर्डिले पुन्हा ‘किंग’, मात्र ताकद विखेंची

अशोक परुडे

अहमदनगरः माजी आमदार शिवाजी कर्डिले हे ( Shivaji Kardile) मी तेल लावलेला पहिलवान असल्याचे सांगून विरोधकांना नेहमीच धोबीपछाड देतात. आताही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आहे. त्यात खरी धोबीपछाड ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाच आहे. ही धोबीपछाड तशी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या मदतीने झाली आहे. मोठे पद नसलेले कर्डिले हे आता पुन्हा नगरच्या राजकारणातील किंग ठरले आहेत.

कर्डिले अध्यक्ष झाले अन् घुलेंचे बॅनर उतरले

जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होण्याने त्यांचे नगरच्या राजकारणातील वजन आणखी वाढले आहे. सहकारी कारखान्यांना जिल्हा बँकेमार्फत कर्जवाटप हा कळीचा मुद्दा असतो. ज्याच्या हातात बँकेची सत्ता, त्यातून त्यांच्या पक्षाला राजकीय फायदा मिळत असतो. तर भविष्यातील निवडणुकाही महत्त्वाच्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. उदय शेळके हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. आजारपणामुळे त्यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, काँग्रेसचे ३, भाजप सहा, शिवसेना पुरस्कृत एक असे संचालक आहेत. राष्ट्रवादीचे काँग्रेसचा अध्यक्ष, काँग्रेसचा उपाध्यक्ष असे जिल्हा बँकेचे सध्याचे समीकरण होते.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार हे नक्की मानले जात होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व आशुतोष काळे, राहुल जगताप हे या पदाच्या शर्यतीत होते. त्यात घुले यांचे नाव अजित पवारांच्या नगर दौऱ्यात अंतिम केले होते. तसे पोस्टरही लागले होते. महाविकास आघाडीचे 13 संचालक असल्याने घुले हेच अध्यक्ष होणार हे नक्की मानले जात होते.

परंतु पालकमंत्री असलेल्या विखे यांना जिल्हा बँक ताब्यात घेऊन आपल्या राजकारणाला आणखी बळकटी द्यायची होती. तर कर्डिले यांच्याकडेही सध्या मोठे पद नव्हते. त्यात काही संचालक आपल्याकडे वळविण्यात कर्डिले-विखे हे यशस्वी ठरले आणि कर्डिले विखेंच्या मदतीने पुन्हा किंग ठरले.

राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले हे पराभूत झाले होते. त्यावेळी पराभवाला विखे जबाबदार असल्याची भावना कर्डिले व इतरांची होती. याची थेट तक्रार भाजप पक्षश्रेष्ठीकडे झाली होती. पण आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून विखेंनी कर्डिलेंना ताकद दिली आहे. त्यामुळे आता कर्डिले हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुन्हा किंग झाले आहेत.

ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले आहेत. त्यापूर्वी ते २००८-२००९ मध्ये ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. कर्डिले किंग झाले असले तरी त्यांच्या पाठीमागे विखेंची ताकद आहे. विखेंमुळे मी अध्यक्ष झालो असल्याचे कर्डिले यांनी जाहीरपणे कबूल केले.

कर्डिले-विखे या जोडीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना हा धक्का दिला आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेची ताकद महत्त्वाची आहे. तसेच जिल्ह्यातील सहकारी कारखान्यावर बँकेच्या माध्यमातून अंकुश ठेवता येतो.

त्यामुळे विखेंच्या मदतीने कर्डिलेंची ताकद वाढली आहे. तर या माध्यमातून जिल्ह्यात भाजपची ताकद कशी वाढविता येईल. सुजय विखे हे अहमदनगरचे खासदार आहेत. या भागात शहरातून संग्राम जगताप, पारनेरला निलेश लंके, कर्जत-जामखेडला रोहित पवार, राहुरी प्राजक्त तनपुरे असे 4 आमदार आहे. आगामी निवडणुकीपूर्वी या सर्वांची ताकद कशी कमी करता येईल, विखेंचे कुटुंबाचे वर्चस्व कसे पूर्ण ताकदीने राहिल हे राजकारण यामागे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube