बोम्मईंना जशास तसं उत्तर द्या, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर संतापले…

बोम्मईंना जशास तसं उत्तर द्या, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर संतापले…

नागपूर : महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई यांनी पुन्हा एकदा केला. याला उत्तर देताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बोम्मई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटकवासियांना बरं वाटण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची वक्तव्य केली पाहिजेत. त्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांना आणि राज्यातल्या जनतेला समाधान वाटेल.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या सभागृहातही यासंदर्भातला ठराव मंजूर करण्याबाबत विरोधी पक्ष पाठिंबा देणार आहे. आपल्याकडेही तसा ठराव केला जाईल. कर्नाटकला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, अशी भूमिका मांडली. मी त्याबद्दल पुन्हा सभागृहात विधानसभा अध्यक्षांना विचारून तो ठराव कोणत्या तारखेला घ्यायचा याबाबत विनंती करेन. ठराव नक्कीच घेतला जाईल. महाराष्ट्राचं विधिमंडळ मराठी भाषिकांच्या बाजूने आहे हे दाखवलं जाईल, असंही पवार म्हणाले.

बोम्मई त्यांच्या भूमिकेवर अडून राहिले आहेत. पण सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे. एक अन् एक इंच भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातही राज्याच्या वतीने हीच भूमिका मांडण्याचं काम राज्य सरकारनं करावं अशी आमची त्यांच्याकडे आग्रही मागणी आहे, असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.

सीमाभागातील गावं महाराष्ट्रात कशी येतील? यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आपल्या सरकारनं आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उत्तर दिलं पाहिजे, असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube