Hemant Rasne यांचे निवडणूक जिंकण्याआधीच होर्डिंग, अंधारेंनी सुनावले

Hemant Rasne यांचे निवडणूक जिंकण्याआधीच होर्डिंग, अंधारेंनी सुनावले

भाजपचे ( BJP ) कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार असलेले हेमंत रासने ( Hemant Rasane ) यांचे निवडणुकीच्या निकालाआधीच विजयाचे पोस्टर लागले आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केले आहे. विजयी होणार हे निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितले की काय, असा खोचक प्रश्न विचारत त्यांनी टीका केली आहे.

हेमंत रासने हे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात होते. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी लागणार आहे. त्याआधीच रासने यांच्या विजयाचे मोठे होर्डिंग लागले आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याने त्यांचे होर्डिंग लावले आहे. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

सकाळी सकाळी रासने जिंकण्याची ही फ्लेक्स बाजी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आणणारी नाही का…?? या फ्लेक्स बाजीचा अर्थ काय काढायचा, हे तथाकथित महाशक्तीच्या मनसबदाऱ्यांनी कृपया आम्हाला समजावून सांगावे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच विजयी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितलं की काय? असा खोचक प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

(Maharashtra Budget Session : कांदाप्रश्नी विरोधकांनी घेरलं; शिंदेंच्या मदतीला पुन्हा फडणवीस धावले)

.याआधी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे होर्डिंग देखील लावण्यात आले होते. पण काही काळाने त्यांचे होर्डिंग काढण्यात आले. यावरुन दोन्ही उमदेवारांचा समर्थकांमध्ये विजयाचा विश्वास असल्याचे दिसून येते आहे.

दरम्यान कसबा व पिंपरी चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका भाजप, शिंदे गट व महाविकास आघाडी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या 25 वर्षांपासून याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडूण येत आहे. त्यामुळे विजयाच्या आधीच अशा प्रकारचे होर्डिंग लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube