Bharat Gogavale : ‘….तर सुभाष देसाई हे देखील शिवसेनेत येतील’
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी काल बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या पक्षप्रवेशाने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशावर अनेक प्रतिक्रिया येत असून आता शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.
गोगावले यांनी सांगितले की, जे शिवसेनेते येतील, त्या सगळ्याचं पक्षात स्वागत असेल. बरेच लोक हे शिवसेनेत येण्यासाठी लाईन लावून आहेत. राजकारण आणि खेळात काहीही होऊ शकतं. भूषण यांना वाटलं असेल की, शिंदे गट राग-लोभ मनात ठेवत नाही. ते चांगलं काम करतात. त्यामुळे आपण बाळासाहेबाच्या खऱ्या शिवसेनेत जावं, हे वाटलं असेल. ते स्वाभाविक आहे, असं गोगावले यांनी म्हटलं.
भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावरून आ. वैभव नाईक यांनी भूषण यांच्यावर निशाणा साधला होता. देसाई यांचा एमआयडीसीमधील हस्तक्षेप वाढला होता. त्यामुळे एका प्रकरणातील दबावापोटी ते शिवसेनेत गेले, असं ते म्हणाले होते. त्यावरही गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, कालपर्यंत भूषण देसाई हे ठाकरे गटात होते. तोपर्यंत नाईक काही बोलले नाहीत. तेव्हा त्यांनी देसाई यांच्यावर का कारवाई केली नाही? आणि आता आमच्याकडे आल्यानंतर त्यांना का पोटशूळ होतो? असा सवाल करत आम्ही वैभव नाईकांना गांभीर्याने घेत नाही, असं गोगावलेंनी सांगितलं.
शेतकरी, कष्टकरी देणार मुख्यमंत्री शिंदेंना टक्कर
दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे घरा-घरात फुट पडली असं बोलल्या जातं. ठाकरे गटाकडूनही घर फोडण्याचे का सुरू असल्याची टीका केली जातेय. वारंवार करण्यात येत असलेल्या या टीकेला गोगावलेंनी जोरदार पलटवार केला. आम्ही गर फोडण्याचे काम करत नसून ज्यांना शिवसेनेचे काम पटते, ज्यांना एकनाथ शिंदे यांचे काम भावते, ते शिंदे यांच्याबरोबर येत आहेत. त्यामुळे घराघरात फुट पडायचा प्रश्न नाही. घरातील एका सदस्याला जसा शिवसेनेत प्रवेश मिळतो, तसं अख्या घरालाही आम्ही सामावून घेतो. आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आहे. आता देसाईंना पुत्र प्रेम असेल तर तेही शिवसेनीत येतील, असं सांगितलं.