अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची झिरवळांची मागणी

नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याने या चर्चेला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (338)

Zirwal demands Sunetra Pawar to be made Deputy Chief Minister : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत हजारोंचा जनसागर उसळला होता. साश्रू नयनांनी नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. अंत्यविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवळ यांनी एक मोठी राजकीय मागणी केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. झिरवळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणि हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री होते. त्याचबरोबर ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. त्यांच्या निधनानंतर या सर्व जबाबदाऱ्या कोण सांभाळणार, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाला आहे.

अंत्यविधीच्या वेळी पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही उपस्थित मान्यवरांच्या भेटीगाठी घेताना दिसत होते. संपूर्ण विधीस्थळी हे दोघेच पुढे उभे होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आणि पवार कुटुंबातील सदस्य खाली बसलेले होते. या दृश्यामुळे पार्थ आणि जय पवार हेच अजित पवार यांचे राजकीय वारसदार असू शकतात, अशी चर्चा रंगली होती. अशातच नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याने या चर्चेला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. abp माझाशी बोलताना झिरवळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पवार कुटुंबीय राजकारणात नेहमीच व्यावहारिक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. परिस्थितीची गरज आणि भविष्यातील राजकीय समीकरणे ओळखून निर्णय घेण्यात हे कुटुंब वाकबगार मानले जाते. एकीकडे अजित पवार यांच्या निधनाचे तीव्र दुःख असताना, दुसरीकडे त्यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, उपमुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतला जाणार आणि पवार कुटुंबाची पुढील राजकीय दिशा काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us