राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोयना जलसागर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार

महायुती सरकारने कोयना जलसागराला आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 29T205302.739

Renaming of the Koyna Reservoir : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आणि राज्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या कोयना जलसागराच्या नामांतराचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कोयना जलसागराला आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भातील शासन आदेशही जारी करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

कोयना धरण आणि त्याचा विस्तीर्ण जलसाठा हा राज्यातील सर्वात महत्त्वाच्या जलसंपदा प्रकल्पांपैकी एक मानला जातो. सिंचन, जलपुरवठा आणि वीज निर्मितीच्या दृष्टीने कोयना प्रकल्पाचे योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे या जलसागराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध शिवप्रेमी संघटना, नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून केली जात होती.

यापूर्वी या जलसागराचा उल्लेख शिवाजी जलसागर असा केला जात होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांचा एकेरी उल्लेख टाळून त्यांच्या पूर्ण नावाने सन्मानपूर्वक संबोधले जावे, अशी भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर जलसागराचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने पुढे येत होती.

व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार जाहीर; हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव जाहीर

या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोयना जलसागराच्या नामांतराचा प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा आणि शिवप्रेमी नागरिकांच्या भावनांचा विचार करून राज्य सरकारने नामांतरास मंजुरी दिली.

महायुती सरकारने जारी केलेल्या शासन आदेशानुसार आता सर्व शासकीय नोंदी, कागदपत्रे आणि अधिकृत व्यवहारांमध्ये या जलसागराचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असा केला जाणार आहे. या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. शिवप्रेमी नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाल्याचे सांगत त्यांनी हा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणारा असल्याचे नमूद केले.

राज्याच्या इतिहासात आणि जनमानसात विशेष स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कोयना जलसागराची ओळख निर्माण होणार असल्याने राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या या जलसागराला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लाभल्याने त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे.

follow us