बाळासाहेब थोरातांचाच माणूस काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी, पटोलेंकडून शिक्कामोर्तब
Ahmednagar Politics:विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेंच्या अपक्ष निवडणुकीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. तांबे यांना पाठिंबा देणारे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी कारवाई केली होती. परंतु आता प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नेते मानणाऱ्या व्यक्तीला ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पक्षाचे नेते राजेंद्र नागवडे यांची या पदावर आज नियुक्ती झाली आहे.
जयंत पाटील म्हणाले, सर्व मार्गानं चिरडायचा कार्यक्रम होतोय
नागवडे यांच्या रुपाने काँग्रेसला एक ताकदवार जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचा अंतर्गत वाद राज्यात चांगलाच गाजला होता. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप झाले होते. अहमदनगर जिल्हा काँग्रेसमध्ये दोन गट झाले होते. सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यावरून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना पदावरून काढून टाकण्यात आले. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.
ग्रामीण जिल्हाध्यक्षाची जबाबदारी शहराध्यक्ष किरण काळे यांच्याकडे देण्यात आले होत. सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यानंतर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वादही मिटला आहे. हा वाद मिटविण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी लक्ष घातले होते.
हा वाद मिटल्यानंतर नव्याने प्रभारी जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती करताना पटोले यांनी थोरातांच्या मर्जीतील राजेंद्र नागवडे यांना पसंती दिली आहे. नागवडे हे सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याच्या माध्यमातून सध्या राजकारणात आहेत.