शिर्डी विमानतळावर फडणवीस आणि विखेंमध्ये गुप्त चर्चा; सत्यजित ताबेंबद्दल खलबतं?
अहमदनगर : बीडला निघालेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी शिर्डी विमानतळावर आले. तेथून ते हेलिकॉप्टरने बीडला गेले. तेथे काही वेळ त्यांनी पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाजूला जाऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजला नसला तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही यासंबधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
शिर्डीच्या विमानतळावर रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस आले, तेव्हा त्यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केलं. त्यावेळी त्यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा देत तिळगुळ दिले. यावेळी भाजपचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शिवाजी धुमाळ, अभय शेळके, दीपक पठारे आदी उपस्थित होते. काही वेळ दोन्ही नेत्यांनी बाजूला जाऊन चर्चा केली. त्यांच्या चर्चेचा विषय नेमका काय तो समजू शकला नाही मात्र सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही? याबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या चर्चेबद्दल बोलणं विखे पाटील यांनी देखील टाळल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल आता बाळासाहेब थोरात यांनी बोलावं, पण ते याबद्दल अद्याप काहीच बोलले नाहीत. सध्याच्या राजकारणातील घडामोडीला थोरात यांची संमती होती का? आता त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.