शिंदेची चहू बाजूंनी कोंडी होतेय का?

शिंदेची चहू बाजूंनी कोंडी होतेय का?

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी : काही दिवसापासून विशेषतः शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्या दिवसांपासून सरकारमध्ये शिंदे गट विरोधकांच्या आणि लोकांच्या टीकेला बळी पडले आहे. शिंदे गटाची नक्की हे प्रकरणं येताहेत कुठून? त्याचा शिंदेंसोबत संबंध जोडला कसा जातोय? त्याचा शिंदेच्या प्रतिमेवर काय परिणाम होणार याचा आढावा घेऊया.

गेल्या काही दिवसात शिंदे सरकारच्या बदनामीचे एक-एक किस्से समोर येताहेत. सरकार स्थापन झालं, त्याचवेळी शिवसेनेचे आमदार 50 खोके घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले हा आरोप गावागावात गेलाय. आता शिंदे गटातील आमदार निवडून येणार नाहीत. अथवा त्यांना भाजपा शिवाय पर्याय राहणार नाही हा प्रयत्न होतंय. याचीही चर्चा झाली. असं असतानाही शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हा भाजपतील अनेकांसाठी धक्का होता. शिंदे मंत्रिमंडळ स्थापन होण्यापासून संजय राठोड यांचं पूजा चव्हान प्रकरण समोर आलं, अब्दुल सत्तार यांचं TET शिक्षक परीक्षा घोटाळा बाहेर काढला गेला. तरी देखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. खरंतर ही दोन व्यक्तीचं का? एक तर या दोन्ही मंत्र्यांची प्रतिमा जनतेत आधीच बदनामीकारक ठरली आहे. ते राजकीय दृष्ट्या अरोपासाठी सॉफ्ट कॉर्नर आहेत.

संजय राठोड हे थेट एकनाथ शिंदे समर्थक आहेत. तर अब्दुल सत्तार हे विखे पाटील यांचे खांदे समर्थक आहेत. एव्हाना गटा-तटाच्या राजकारणात ते विखे गटात मोडतात. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि विखे पाटील यांचा दिल्लीतला संपर्क वाढला आहे, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची थेट चर्चा होतेय, दोन्ही मराठा चेहरा आणि आर्थिक सक्षम आहेत. भविष्यात ते स्पर्धक ठरतील का ही भीती भाजपामध्ये अनेकांना आहे. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वावर आणि त्यांचा त्याच्याच नेत्यांवर नियंत्रण नाही, हा दृष्टीकोन तयार केला जातोय का? हा देखील एक मुद्दा समोर आणला जातोय.

शिंदे गटाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा वर शिवसेना उध्दव ठाकरे गट अधिकाधिक आक्रमक झाला. त्यावर शिंदे गटाने थेट आदित्य ठाकरे यांच्यावर दीपा सलियान प्रकरणावरून हल्ला केला. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाने राहुल शेवाळे यांचं प्रेमप्रकरण बाहेर काढलं. या दोन्हीच्या वादात उद्धव ठाकरे यांची भाजपाविषयी असलेली लढण्याची शक्ती शिंदे गटावर खर्च होऊ लागली आहे. हे कुणाला हवं आहे का? या आशयानं याकडं पाहिलं जात आहे. ज्याप्रमाणं पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांची प्रकरणं बाहेर काढली गेली, यामागं कोण होतं याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण त्यांना क्लीन चीट देत त्यांना पक्षात गोंजारण्याचा आणि नियंत्रणात ठेवण्याचाही प्रयत्न त्यावेळी सर्वांना आठवणीत आहेत. याच शस्त्राचा वापर एकनाथ शिंदे यांच्यासाठी होतोय का? याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

दिवाळीमध्ये शिधा वाटप ठेका कुणी दिला? तो विभाग भाजपच्या मंत्र्याकडं असताना त्यात बदनामी शिंदे सरकार म्हणजे एकनाथ शिंदे यांचीच झाली. ज्या विभागानं ठेका दिला त्याच्याविषयी विरोधक का आक्रमक झाले नाही? त्यावेळी ही बदनामी मुख्यमंत्री या नात्यानं एकनाथ शिंदे यांचीच झाली. हे का झालं? हा मंत्री आणि ठेकेदार याच्या पाठीशी कुठली शक्ती होती? की विरोधकांनी अवाक्षरही काढलं नाही.

आदिवासी विभागाचं दूध पुरवठा कंत्राट थेट न्यायालयात गेलं. हा विभाग भाजपाकडं आहे, याविषयी चर्चा आरोप का झाले नाही? गेल्या वर्षभरापासून कामगार विभागात सेंट्रल किचनबाबत अनेक तक्रारी आल्यात, संतोष बांगर या आमदारानं थेट कंत्राटदाराच्या श्रीमुखात लगावली. हे प्रकरण गाजलं. पण राज्यभर हा ठेका ज्या ठेकेदारांना देण्यात आला. तो कामगार विभाग भाजपकडं आहे. कामगारांचा मध्यान्ह भोजनाचा ठेका ज्याला देण्यात आला, त्यांनाच दिवाळी शिधाचा ठेका देण्यात आला. म्हणजेच भाजपाच्या कामगार विभागाच्या ठेकेदारामागे कुठली शक्ती आहे? विरोधकांकडून कामगार मंत्र्यांचा राजीनामा का मागण्यात आला नाही? एकूणच भाजप मंत्र्यांच्या खात्यात गैरव्यवहार नाही किंवा शिंदे- फडणवीस सरकारमध्ये भाजपचे नेतृत्व आणि पक्षाची प्रतिमा स्वच्छ आहे, हे परसेप्शन तयार केले जातेय का?

शिवसेना फोडून शिवसेनेची अवस्था बिकट करणारे भ्रष्टाचार आरोपात सापडत असतील तर त्यांना अधिकाधिक बदनाम करण्याची संधी उद्धव गटाला हवी आहेत. त्या भागात या नेत्यांची प्रतिमा मलिन होऊन सहानुभूती घेण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच असेल का? दुसरीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत आलेल्या विशेषतः गृह विभाग ताब्यात असलेल्या भाजपशी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सध्या तरी पंगा घ्यायचा नाही, त्यांना राजकीय सॉफ्ट कॉर्नर म्हणून शिंदेगट योग्यच आहे. आक्रमक विरोधी पक्षाची प्रतिमा निर्माण करणे आणि भाजपशी थेट संघर्ष करायला विरोधी पक्षातील नेते दुहेरी भूमिकेत वागत आहेत, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय.

एकूणच काय तर शिंदे गट अथवा शिंदे यांचं महत्त्व वाढने ना भाजपसाठी परवडणार आहे, ना शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी परवडणारं आहे. यात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला जनतेत आक्रमक विरोधी पक्षाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी शिंदे गट फायदेशीर आहे. एकूण शिंदे यांची चहू बाजूंनी कोंडी होतेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube