ठाकरे गट खाली करण्याचा शिंदेंचा चंग ! नाशिकमध्ये धक्क्यांवर धक्के

Eknath Shinde VS Uddhav Thackeray: महायुतीमध्ये सध्या एक रस्सीखेच सुरू आहे. ती रस्सीखेच आहे इतर पक्षातील माजी आमदार, माजी पदाधिकारी यांना पक्षात खेचण्याची. तिन्ही पक्षात दररोज कुठेना-कुठे पक्ष प्रवेशाच्या बातम्या येतात. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जरा आघाडीवरच आहे. ते कुणाला धक्का देतात हे तुम्हाला माहित आहे. त्यांच्या रडारवर असतात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray). आतापर्यंत शिंदेंनी ठाकरेंचे अनेक माजी आमदार फोडले. त्यात काँग्रेसचेही काही आहेत. उद्धव ठाकरेंच्या आवडत्या नाशिकमध्ये शिंदेंनी (Shivsena) अनेक जणांना पक्षात घेत ताकद वाढविलीच. पण एका मतदारसंघात अजितदादांना अप्रत्यक्ष शिंदेंनी घेरले. नाशिकमध्ये शिंदेंनी एेवढी का ताकद वाढवलीय. आतापर्यंत किती जणांना पक्षात घेतलंय. त्यांचे पुढे काय होईल हे आपण व्हिडिओत पाहुया…
विधानसभा निवडणुकीनंतर खरी शिवसेना कुणाची आहे हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले आणि बोलून दाखविले आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिंदेंना पक्ष बळकट करून आपली ताकद कायम ठेवायचीय. मुंबई, ठाण्यानंतर नाशिक हे शिंदेंसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथील महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपालिका, झेडपी जिंकण्यासाठी शिंदेंनी फौज जमा केलीय.त्यांनी नाशिक शहरापासून ते गावापर्यंत ताकद वाढविलीय. काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकांमधील अनेक माजी नगरसेविकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यात ठाकरे यांचे माजी नगरसेवक अधिक होते. पण आता दोन माजी आमदार हे शिंदेंनी गळाला लावलेत. त्यातील एक विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे. दुसऱ्या म्हणजे इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित. हे दोघेही ठाकरे गटातच होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंना दोन मोठे धक्के बसलेत.
ब्रेकिंग : वैष्णवी हगवणे प्रकरण भोवलं; IG जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका; कार्यभार काढला
दोघे भाऊ एकाच पक्षात
नरेंद्र दराडे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आलेत. पण त्यांचे बंधू किशोर दराडे गेल्याच वर्षी एकनाथ शिंदेंकडे आले. त्यामुळे ते पुन्हा नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर पोहोचले. दराडे मात्र कुंपणावरून राहून योग्य संधी साधत होते. नरेंद्र दराडे व छगन भुजबळ यांच्यामध्ये राजकीय वैर आहे. आता भुजबळ मंत्री झाल्यानंतर नरेंद्र दराडे हे शिंदे सेनेत डेरेदाखल झाले. परंतु त्यांचे चिरंजीव कुणाल दराडे हे उद्धव ठाकरेंच्या गटाचे जिल्हा समन्वयक आहे. त्यामुळे वडिल शिंदेकडे आणि मुलगा ठाकरेंकडे अशी अवस्था दराडे यांची झाली असली तरी कुणाल दराडे हे कधीही पक्ष सोडू शकतात.
निर्मला गावितांच्या प्रवेशाने सर्वांना बसला धक्का
इगतपुरीचे माजी आमदार निर्मला गावितांच्या शिंदे गटातील प्रवेशाने मात्र अनेकांना धक्का बसलाय. निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसच्या. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. त्या ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा इगतपूरी मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार राहिल्या आहेत. 2019मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आलेल्या हिरामण खोसकरांनी निर्मला गावितांचा तेव्हा पराभव केलाय. त्यानंतर 2024 ला खोसकर हे अजितदादांकडे गेले आणि आमदार झाले. गावित या पुन्हा काँग्रेसमध्ये येणार होत्या. पण त्यांचा प्रवेश झाला नाही आणि त्या ठाकरे गटात राहिल्या. त्या भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु त्या अचानक शिंदे गटात दाखल झाल्या.
इगतपुरीत अजितदादांविरुद्ध एकनाथ शिंदे
इगतपुरीमध्ये शिंदे यांची ताकद नव्हती. येथे ताकद वाढविण्यासाठी शिंदेनी प्रयत्न सुरू केलेत. विशेष म्हणजे गावित यांचे कट्टर विरोधक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हेही शिंदे गटात म्हणजे स्वगृही आलेत. तर इगतपुरीचे शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंगबाबा गांगड हेही शिंदे गटात आहेत. म्हणजे इगतपुरीत शिंदेंकडे माजी आमदारांचा ट्रीपल धमाका आहे. येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर हे आमदार आहे. इगतपुरीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच ताकद दिसून येत आहे.
इगतपुरीच्या राजकारणाबाबत नाशिक ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांच्याकडून जाणून घेतले. ते सांगतात इगतपुरी तालुका हा एकेकाळी शिवसेनाचा बालेकिल्ला होता. हा तालुका काँग्रेसने निर्मला गावितांमध्ये पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. आता ठाकरे गटाच्या गावित याच शिंदेसेनेत आल्यात. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना रिकामी झाली असून, ठाकरेंची सेना अस्तित्वहिन झालीय. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसून येईल. एकनाथ शिंदे यांनी इगतपुरीत ताकद लावलीय. त्यामुळे शिंदेसेनेला अजितदादांच्या राष्ट्रवादीशी येथे संघर्ष करावा लागणार आहे. परंतु अनेक नेते पक्षात घेतल्याने पंचायत समिती, झेडपी, नगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचे चॅलेंज शिंदेंसमोर असणार हे नक्की.