Girish Bapat : भाजपचा ‘घायाळ वाघ’ अखेर मैदानात

Girish Bapat : भाजपचा ‘घायाळ वाघ’ अखेर मैदानात

भाजपचे ( BJP )  पुण्याचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat )  यांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून खराब आहे. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहीत कसबा ( Kasaba ) पोटनिवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. यावरुन गिरीश बापट हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे या भागात त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. बापट नाराज असल्याच्या चर्चेचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे आता थेट गिरीश बापट स्वत: या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत.

गिरीश बापट हे आज सायंकाळी 5 वाजता केसरीवाडा, नारायण पेठ येथे कार्यकर्त्यांचा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यासाठी एक पत्रक देखील जारी करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, लोकजनशक्ती पार्टी, पतित पावन संघटना आदी पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  यावेळी ते कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या अगोदर बापट यांनी पत्र लिहीत आजारी असल्याचे सांगितले होते. गेले  3 महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी खूप काम कमी केले असून मला सद्ध्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. वरील कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिक रित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही. असं बापट यांनी स्पष्ट केलं होतं

दरम्यान या निवडणुकीत बापट हे आपल्या सुनेला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. पण त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. यावरुन बापट नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती.

तसेच या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला तिकीट न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा होती. कसब्याच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील पक्षासाठी मतदान केले होते. त्यामुळे त्यांच्या घरात देखील उमेदवारी न दिल्याने अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे.  याचबरोबर भाजपचे नेते संजय काकडे देखील या निवडणूक प्रचारापासून लांब आहेत. त्यामुळे आता या सर्व विषयांवर बापट काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube