Sharad Pawar यांची ही खेळी… पण धनंजय मुंडे यांना धक्काबुक्की का झाली?

  • Written By: Published:
Sharad Pawar यांची ही खेळी… पण धनंजय मुंडे यांना धक्काबुक्की का झाली?

प्रफुल्ल साळुंखे

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या सकाळच्या शपथविधीवरून अनेक गौप्यस्फोट होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात त्यावरून जुंपली आहे. हा शपथविधी शरद पवारांनी बोलून झाला होता, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आणि ऐन वेळी पाठिंबा देण्यास नकार देऊन पवारांनी विश्वासघात केला, असा आरोप केला. तर दुसरीकडे हा शपथविधी हा राज्यात लागू केलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठीची खेळी होती, असे सांगत पवार यांनी फडणवीस यांना कोंडीत पकडले. पण हे दोघेही सांगतात त्यात तथ्य किती आणि तो शपथविधी झाल्यानंतर बदललेले राजकीय वातावरण कसे होते, याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. (Sharad Pawar Vs Devendra Fadnavis)

विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेसमोर महाराष्ट्रामधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गर्भगळीत झाली होती. दोन्ही काॅंग्रेसला लोकसभेत केवळ पाच जागा आणि दिग्गजांचा झालेला पराभव यामुळे अनेक नेत्यांत अस्वस्थता होती. विधानसभा निवडणूक झाली तरी त्यात अतिशय काठावर जागा मिळतील, असेच वातावरण दोन्ही काॅंग्रेसमध्ये होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर धनंजय मुंडे आणि अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळी ते रायगडमध्ये असल्याचे चर्चा चांगलीच रंगली होती. धनाजय मुंडे, अजित पवार आणि सुनील तटकरे भाजपच्या रडारवर असल्याच्या बातम्याही आल्या. पण त्यानंतर कुठलीही हालचाल झाली नाही.

याच दरम्यान भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांनी एक विधान केल होते. आगामी काळात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवदी काँग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार सत्तेत येईल. पण या विधानाची दखल माध्यमानी गंभीरतेने घेतली नाही. पण खडसे यांच्या विधानाकडे गिरीश महाजन ना देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करू शकत नव्हते. म्हणूनच एक विरोधातला एक गट हाताशी असावा, असा प्रयत्न भाजपचा होता. विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. अजित पवार, सुनील शेळके यांना मिळालेलं मताधिक्य किंवा धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांचा विजय नजरेत भरत होता. भाजपचा सर्वत्र बोलबाला असताना अजितदादा यांच्या अनेक समर्थकांचा झालेला अनपेक्षित विजयाचे गौडबंगाल काय, याची कुणकुण तेव्हा राष्ट्रवादीमध्ये होती. यामागे भाजपचा एक गट मदत पुरवत असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी थेट केला होता.

उद्भव ठाकरे यांनी भाजपचा हात सोडला आणि काँग्रेस- राष्ट्रवादी यांच्यात संजय राऊत यांच्या पुढाकारानं चर्चा आणि बैठका सुरु झाल्या होत्या. या बैठकीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला होता. संभाव्य सरकार स्थापनेबाबत अनेक बैठका झाल्या. वाद होता तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे आले. पण या नावाला काँग्रेस- राष्ट्रवादी मधून विरोध झाला. त्यात राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद, काँग्रेसमधून दोन उपमुख्यमंत्री नेमण्यासाठीची मागणी, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या परस्परविरोधी भूमिका अशा गोंधळाच्या वातावरणात या बैठका पार पडत होत्या. यातील महत्वाची बैठक नेहरू सेंटरला पार पडली. यावेळी अजित पवार संतापात उठून बाहेर पडले. त्यानंतर लगेच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे तीनही पक्षांकडून मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आल्याची घोषणा केली होती. या बैठकीनंतर उद्या काहीतरी विपरीत घडेल, अशी शंका काँग्रेसच्या दोन माजी आमदारांनी उपस्थित केली होती. हे माजी आमदार विलासराव देशमुख यांचे सरकार वाचवताना फ्लोअर मॅनेजमेंटचे प्रमुख शिलेदार होते. त्यांनी उपथित केलेली शंका पहाटेच खरी ठरली अजित पवार आणि देवेंद्र फडणसीस यांच्यात दुसऱ्या दिवशी शपथविधी झाला.

सकाळचा शपथविधी शरद पवार यांच्याशी बोलून झाल्याचा दावा आता फडणवीस करत आहेत. पण तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांना याची कल्पना का नव्हती? ज्या वेळी शपथविधी होणार आहे त्यावेळी चंद्रकांत पाटील हे सातारा येथे होते. `सह्याद्री` या अतिथीगृहावर अतिशय महत्त्वाची बैठक म्हणून पाटील यांना तातडीने पाचारण करण्यात आला होता. पाटील यांची गाडी तीनबत्ती सिग्नलवर `सह्याद्री`कडे न वळता राजभवनकडे वळाली. त्यावेळी काहीतरी राजकीय स्फोट असल्याचा अंदाज चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला. इतका हा शपथविधी गुप्त ठेवण्यात आला होता.

फडणवीस आणि अजितदादा यांचा शपथविधी उरकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडली होती. काही आमदार शपथविधीवरून थेट पवार यांच्या निवासस्थानी गेले. नरहरी झिरवाळ यांच्यासारखे आमदार हे स्पेशल विमानाने दिल्लीला गेले. त्यानंतर सकाळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या दरम्यान सोशल मिडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. सकाळी १० वाजता शरद पवार यशवंतराव चव्हाण भवनला दाखल झाले. तेथे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आले. या वेळी सर्वात प्रथम शरद पवार यांच्याकडून जो निरोप बाहेर आला तो निरोप असा होता, “सुनील तटकरे कुठे आहे? त्यांना घेऊन या.“ त्यानंतर सुनील तटकरे यांना शोधण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील गेले. राष्ट्रवादीच्या बऱ्याच आमदारांना अजितदादांकडून धनंजय मुंडे यांच्या बी-६ या बंगल्यावर बोलविण्यात आले होते. पण मुंडे हेच त्या वेळी बंगल्यावर नव्हते. आव्हाड यांनी तटकरे यांना शोधून पवारांकडे आणले. मुंडे आणि अजित पवार यांना परत आणण्याची जबाबदारी तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली. सकाळी गेलेले तटकरे संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंडे यांच्यासह वाय. बी. सेंटरला आले. तेथे मोठी गर्दी होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तटकरे यांच्यासह मुंडे हे चव्हाण सेंटरपाशी आलेले असताना त्यांना धक्काबुक्की झाली. हे सारे दृश्य त्या वेळ कॅमेऱ्यांनी टिपले. हा शपथविधी शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाला होता तर धनंजय मुंडे बारा तास गायब का होते? जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांची समजूत घालण्यासाठी वारंवार का जात होते, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. या शपथविधी नंतर सुप्रिया सुळे यांनी पार्टी आणि कुटुंबात `स्प्लिट` असा मेसेज व्हाॅटसअप स्टेटस म्हणून ठेवला होता. त्याचीही तेव्हा मोठी चर्चा होती.

पहाटेच्या शपथविधीमागे…? या गौप्यस्फोटावर केलेला दावा चंद्रकांत पाटलांनी फेटाळला

सकाळचा शपथविधी हा अजित पवारांचे बंड म्हणूनच तेव्हा चर्चिला गेला होता. फडणवीस यांनी पवार यांच्याशी बोलूनच हा निर्णय झाल्याचे सांगत अजितदादांना अडीच वर्षांनी क्लिन चिट देण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर पवार यांनी आपलीच ही खेळी होती, असे सांगत अजित पवार यांची कोणतीच चूक नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. अजित पवार यांनी हे नेमके कोणाच्या सांगण्यावरून केले, याचे उत्तर त्यांनी स्वतः कधीच दिले नाही. या विषयावर आपण बोलणार नसल्याचे सांगत त्यावर आपले मौन कायम ठेवले आहे. सध्या तरी अजित पवार यांना दोन्ही नेत्यांनी दिलासा दिला आहे. ही त्यांच्यासाठी सोयीची गोष्ट ठरली आहे. पण मधल्यामधे तटकरे यांनी कार्यकर्त्यांचा रोष का सहन केला आणि धनंजय मुंडे यांनी धक्काबुक्की का झाली, याचे उत्तर मिळत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube