Nana Patole : ‘राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा’

Nana Patole : ‘राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा’

मुंबई : सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती के एम जोसेफ (Justice KM Joseph) यांच्या खंडपीठासमोरील एका सुनावणी दरम्यान, बुधवारी न्यायालयाने शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. महाराष्ट्र सरकार नपुसंक आहे. ते काहीही करत नाही. म्हणून अनेक वाद उफाळून येत आहेत. राजकारणी लोकांनी धर्माचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणं बंद केलं पाहिजे, तरच धार्मिक वाद थांबतील, अशा शब्दात कोर्टाने सरकारला झापलं. या टीकेमुळं सरकारवर मोठी नामुष्की आली. दरम्यान, या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते आहे. अशातच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) देखील सरकारवर निशाणा लगावला.

पटोले यांनी सांगितलं की, राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला ही मोठी चपराक असून सत्तेवर राहण्याचा त्यांना अधिकार राहिलेला नाही त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Rahul Gandhi यांच्यानंतर आणखी एकाचं पद जाणार?; ‘डार्लिंग’ विधानावरून नवा वाद…

शिंदे-फडणवीस सरकारवर सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेला संताप योग्यच आहे असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार कुठेच दिसत नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार खासदार खुलेआम गुंडगिरी करतात. गृहमंत्र्याच्या घरात कुख्यात माफीयाचा हस्तक राजरोस वावरतो तरी पोलीस यंत्रणा व गृहमंत्र्याला त्याची खबर लागत नाही. माजी मंत्री, आमदार यांच्यावर हल्ले होतात तरीही त्याची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार करतो तरी त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असं पटोले यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, एक संघटना राज्यात मागील काही महिन्यांपासून विविध जिल्ह्यात मोर्चे काढते, सभा घेते व भडकाऊ, चिथावणीखोर वक्तव्य करते. यातून सामाजिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. काही संघटनांनी पोलीसांकडे याबाबत तक्रार दाखली केलेली आहे. मात्र, पोलीस यंत्रणांचे हात बांधलेले आहेत. महाराष्ट्र हे पुरोगामी व प्रगत राज्य आहे, मुंबई व महाराष्ट्राचा जगभरात मोठा लौकिक आहे आणि त्याला गालबोट लावण्याचे काम काही संघटना धर्माच्या नावाखाली करत असल्याचं पटोलेंनी सांगितलं

दरम्यान, सरकारने हे प्रकार तातडीने रोखले पाहिजेत पण सरकारमध्येच इच्छाशक्ती नसल्याने अशा संघटनांचे फावते. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारबद्दल जो शब्द वापरला तो आजपर्यंत कोणत्याही सरकारबाबत वापरलेला नाही, यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. शिंदे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, अशा शब्दात पटोलेंना सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube