Chagan Bhujbal : राजकारणातून संन्यास घेणार का?, भुजबळांनी दिलं रोखठोक उत्तर
Chagan Bhujbal : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकवत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर काल मुंबईत दोन्ही गटाच्या बैठका झाल्या. अजित पवार यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले. पक्षात असताना आपल्याला काय त्रास सहन करावा लागला हे ही सांगितले.
सरकारी कर्मचारी 58 व्या वर्षी निवृत्त होतात. आयएएस, आयपीएस 60 व्या तर भाजपातही 75 व्या वर्षी निवृत्त केले जाते मग आपण कुठेतरी थांबणार की नाही अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना थेट प्रश्न केला होता. या विधानानंतर आज पत्रकारांनी आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना 2024 ला तुम्ही शेवटची निवडणूक लढवणार का, असे विचारले.
या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, माझे वय झाल्यामुळेच मी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप कामे असतात. पक्ष संघटनेच्या कामांसाठी सातत्याने फिरावे लागते. याआधी 1999 मध्ये शरद पवारांनी मला प्रदेशाध्यक्ष केले होते. त्यावेळी मी हे पद 4 महिने सांभाळले होते. मी त्यांच्याबरोबर प्रमुख वक्ता म्हणून अनेक ठिकाणी जात होतो. आता यापुढे अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्ष आहे. त्यांनी सांगितले थांबा, तर मी थांबेन.
NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी बनले ढाल…
अजितदादाच पक्षाचे अध्यक्ष राहतील
ते पुढे म्हणाले, आम्ही सरकारमध्ये सामील होण्याच्या अगोदर त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि सह्या घेतलेल्या आहे. अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहे आणि राहतील. निर्णय घेण्याआधी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे. यासाठी पक्षाची घटना पूर्णपणे आम्ही पाळली आहे. निवडणूक आयुक्तांकडे असलेले नियम पाहून त्यांची मांडणी करण्यात आली आहे.
सारखा शब्द फिरवला तर राग येणारच
एक तर तुम्ही त्या वाटेला जायचंच नाही. तुम्ही एकदा -दोनदा गेलात तर ठीक आहे. पण चार-पाच वेळा जाऊन तुम्ही शब्द फिरवलात. यामुळे समोरच्या पक्षातील नेत्यांमध्ये आपल्या पक्षाविषयी आपल्या पक्षातील नेत्यांविषयी राग येणं स्वाभाविक आहे. त्याचे पडसाद वेळोवेळी आम्ही पाहिले आहेत. विठ्ठलाच्या बाजूला बडवे असतात. दोन चार लोकं होती त्याचप्रमाणे होत होते. सूचना देऊनही काहीच घडत नव्हते. अजित पवारांनी याबाबत उघड वाच्यता केली. त्यानंतरही काहीच घडले नाही.