विखे यांचे नाव CM पदासाठी चर्चेत….. पण वेळ अशी आली की ‘महसूल’ जाण्याची चिन्हे!

Ajit Pawar Devendra Fadnavis And Radhakrishna Vikhe

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता तर आहेच पण अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदे गटासह भाजपाच्याही काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.

काही झाले तरी अजित पवार यांना अर्थखाते देऊ नका, अशी मागणी शिंदे गटातून समोर येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आणि येथे चांगला जम बसविलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही दणका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीत काही काळ मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा असलेल्या विखे पाटलांचे (Radhakrishna Vikhe) महसूल खाते जाईल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिंदेंच्या शिलेदारांना निधीसाठी पुन्हा पवारांकडेच जावं लागणार? राष्ट्रवादीचा ‘अर्थ’ खात्यावर दावा!

तसे पाहिले तर विखे पाटील काँग्रेसमधून भाजपात आले. येथे आल्यानंतर त्यांनी आपला राजकीय करिष्मा दाखवत थोडक्याच काळात भाजपात चांगला जम बसविला. याआधीच्या भाजप सरकारच्या काळात त्यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी होती. त्यानंतर भाजप-शिंदे सरकारच्या काळात तर त्यांना थेट महसूलमंत्री पदाचीच लॉटरी लागली. महसूल खाते हे अतिशय वजनदार खाते मानले जाते. विखे यांच्या रुपाने हे खाते नगर जिल्ह्याला मिळाले. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने हे खाते नगर जिल्ह्याकडेच होते.

मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेने हैराण 

इतकेच नाही तर मध्यंतरी विखे मुख्यमंत्री होतील अशीही चर्चा होती. सोशल मीडियावर तशा पोस्टही व्हायरल होत होत्या. यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. पण, विखे यांनी या प्रकारांचे जोरदार खंडण केले होते. माझी बदनामी करण्यासाठी हा खोडसाळ प्रकार केला जात असल्याचे उत्तर विखे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मात्र, या प्रकारांमुळे जो काही संदेश जायचा होता तो गेलाच.

केंद्रीय नेतृत्वाशी थेट संपर्क खटकला, शिंदेंचा वादही उफाळला 

सध्या महसूल खाते विखे पाटील चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. त्यांनी काही चांगले निर्णयही घेतले आहेत. तसेच त्यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशीही चांगले संबंध आहेत. मधूनमधून ते थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय नेत्यांना भेटत असतात. ही त्यांची जमेची बाजू. मात्र, ही गोष्ट भाजपाच्या राज्यातील अनेक नेत्यांना खटकते असेही समोर आले होते. तसेच नगर जिल्ह्यातील स्थानिक भाजप पदाधिकारी आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे आ. राम शिंदे यांची विखेंवरील नाराजी, मध्यंतरी दोघांमध्ये उफाळून आलेला वाद यामुळेही काही वेगळी राजकीय समीकरणे तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजितदादांची हाक अन् तनपुरेंची ‘देवगिरी’वर धाव; दादांनंतर मामांनाही भेटणार

त्यानंतर आता तर दोन दिवसांपूर्वी थेट अजित पवार यांनी भाजप-शिंदे सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. आता अजितदादा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना कोणती खाती द्यायची याचीही चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे. सहा जिल्ह्यांचेही ते पालकमंत्री आहेत. विखे पाटील महसूलमंत्री आहेत. तसेच नगर आणि सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदही त्यांच्याचकडे आहे.

आणखीही काही मंत्र्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्तारात कोणते खाते कोणाला मिळणार, कोणत्या मंत्र्याकडील अतिरिक्त खाते काढून घेतले जाणार, कोणत्या मंत्र्याला नारळ दिला जाणार हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. मात्र आता या नव्या राजकीय घडामोडीत महसूलमंत्री विखे यांचेच महसूल खाते त्यांच्याकडे राहणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube