Imtiaz Jalil यांची पवारांसह राजेश टोपेंवर जोरदार टीका; ‘साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप…

Imtiaz Jalil यांची पवारांसह राजेश टोपेंवर जोरदार टीका; ‘साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप…

राज्यात एकीकडे पिंपरी आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांचीही चर्चा सुरु आहे. एमआयएम (MIM) महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एमआयएमविषयी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएम असा कलगीतुरा चालू झाल्याचं पाहायला मिळत आहे. इम्तियाज जलील जातीयवादी पक्षाचे खासदार असून आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, असे वक्तव्य राजेश टोपेंनी केलं होतं. यावरून आता इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली.

मी राजेश टोपेंना एवढंच सांगेन की धर्मनिरपेक्षतेची तुमची व्याख्या आणि माझी व्याख्या यात खूप मोठा फरक आहे. जर औरंगाबादमधून तुम्ही एखाद्या मुस्लीम उमेदवाराला खासदार म्हणून निवडून आणलं, तर तुमच्या धर्मनिरपेक्षतेला मी मानलं असतं. पण जर इम्तियाज जलील एमआयएम पक्षाकडून निवडून येतो आणि तुम्ही म्हणता की मी जातीयवादी आहे, तर मग तुमच्या धर्मनिरपेक्षतेचा नेमका अर्थ काय ? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

मी मुस्लिमांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण केला. मी कोणत्याही स्तरावर जाऊन त्यांना आव्हान देऊ शकतो. आता आम्ही तुमच्या वरीष्ठांबरोबर बसू शकतो. आता शरद पवारांच्या खाली मी बसणार नाही. मी त्यांच्या शेजारी बसण्याची ताकद ठेवलोय. तुम्ही जर असं म्हणत असाल तर राजेश टोपे खुर्चीवर बसणार आणि इम्तियाज जलील सतरंज्या उचलणार, तर ते दिवस गेले. आता तुम्हाला सतरंज्या उचलाव्या लागणार अशी वेळ मी आणणार, अशी खोचक टीका इम्तियाज जलील यांनी राजेश टोपेंवर केली.

राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मुस्लिमांची मतं घेत राहणार. मुस्लिमांना खूश करण्याकरिता महानगरपालिकेत एखादा नगरसेवक, जिल्हा परिषदेत एखादा सदस्य करायचा, पण विधानसभा किंवा लोकसभेत तुम्हीच जायचं. साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप लोकसभा आणि विधानसभेत वाटण्या करून घेणार आणि आम्ही तुम्हाला मतदान देणार का? फक्त आमच्या गल्लीतले नेते बनून राहणार, अशा शब्दांत जलील यांनी राजेश टोपेंच्या विधानावरून जोरदार टीकास्र सोडलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube