विरोधकांच्या सभात्यागानंतर सत्तार बोलले, तुम्ही किती जमिनी हडपल्या !

  • Written By: Published:
विरोधकांच्या सभात्यागानंतर सत्तार बोलले, तुम्ही किती जमिनी हडपल्या !

नागपूरः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमिनींमध्ये, टीईटीमध्ये घोटाळा केला असून, सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना उत्तर दिले. तुम्ही किती जमिनी हडप केल्या, असा आरोप सत्तार यांनी केलाय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. स्वतःच्या काळातील घोटाळे बाहेर काढणारे पहिला विरोधी पक्ष मी पाहिला, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर विरोधकांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी सरकारकडे केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी मंत्री सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळा, गायरान जमीन वाटपप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. सरकार भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृह सोडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांची बाजू सांभाळत विरोधकांच्या काळात टीईटी घोटाळा झाला आहे. अब्दुल सत्तारांच्या मुलीला नोकरी मिळालेले नाही, असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

टीईटीवरून फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. टीईटी घोटाळा गेल्या सरकारच्या काळात झाला आहे. या घोटाळ्याची तार मंत्रिमंडळापर्यंत पोहचली होती. सत्तारांच्या मुलीला टीईटी परिक्षेतून नोकरी लागलेले नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी खुलासा केलेला आहे. स्वतःच्या सत्ता काळातील घोटाळे बाहेर काढणारे पहिल्या विरोधी पक्ष मी पाहिलेला आहे. बॉम्ब फोडणार म्हणतात पण लवंगी फटाकेही फुटत नाही. अपात्र कंपनीला पात्र ठरवून कोणी टीईटीसाठी नेमली, टीईटी घोटाळा करून मुलांच्या स्वप्नांचा चुराडा कोणी केला, याचे उत्तर द्या, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

तर अब्दुल सत्तार यांनीही आपल्यावर होत असलेल्या आरोपाचे उत्तर दिले. वाशीम येथील योगेर रमेश खंडारे याला जमिन देताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेले आहे. गायरान जमिनी शाळा, आरोग्य केंद्राला दिल्या जातात. अनुसूचित जाती, जमाती, भूमिहिनांना जमिनी देताना धोरणात्मक निर्णय झालेला आहे. अतिक्रमण वगळण्याचे निरीक्षण आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, जो न्यायालय निर्णय घेईल तो मान्य राहिल, असे सत्तार सभागृहात म्हणाले. आपल्यावर आरोपाला उत्तर देताना सत्तार यांनी विरोधकांवर आरोप केले आहे. तुम्ही किती जमिनी हडप केल्या, असा आरोप सत्तारांनी विरोधकांवर केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube