महिला आरक्षण हा जुमला, आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे मंत्री…; आदित्य ठाकरेंची राज्यासह केंद्रावर टीका
Aditya Thackeray On Women’s Reservation Bill : केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) काल लोकसभेत मंजूरी मिळाली. आज विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली. एकदा हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं की, राष्ट्रपतींकडे सहीसाठी जाईल, त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान, या विधेयकावर बोलतांना हा सरकारी जुमला असल्याची टीका विरोधकांनी केली. आज उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या विधेयकावर बोलतांना हे विधेयक जुमला असल्याची टीका करत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0
आज सिंधुदुर्गात पत्रकारांनी महिला आरक्षण विधेयकावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आदित्या ठाकरे म्हणाले की, संसदेत मांडण्यात आलेले महिला आरक्षण विधेयक हा ‘जुमला’ आहे. महिला आरक्षणाला आमचा नक्कीच पाठिंबा आहे. परंतु आधी हे लक्षात घेतलं पाहिजे, की हा जुमला तर नाही ना. जनगणना कधी होणार, मग पुनर्रचना कधी होणार? ही सर्व कार्यवाही झाल्यावर महिला आरक्षण मिळेल. त्यामुळं हा निवडणुकीपुरता एक जुमला असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.
ते म्हणाले, आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे मंत्री आहेत, ज्यांनी महिलांना शिवीगाळ केली आहे. ते अजूनही मंत्रिमंडळात आहेत. ज्या आमदाराच्या मुलांने अपहरण केलं आणि ते सीसीटीव्हीत पकडले गेले तेथे काहीही कार्यवाही झालेली नाही, असं आदित्य म्हणाले.
पुढं बोलतांना ते म्हणाले की, एक गद्दार आमदार असे आहेत ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीच्यावेळी पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला. त्याचे ‘बुलेट शेल्स’ही सापडले, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याच महाराष्ट्रात वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो, मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या युवकांवर लाठीचार्च होतो, बारसूत महिलांवरही लाठीचार्ज झाला, हे असं घटनाबाह्य सरकार किती दिवस चालू शकतं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरला टोला लगावला.