Amol Kolhe : ‘बात निकली है तो दूर तक जाएगी’; कोल्हेंनीही अजितदादांना घेरलंच

Amol Kolhe : ‘बात निकली है तो दूर तक जाएगी’; कोल्हेंनीही अजितदादांना घेरलंच

Amol Kolhe replies Ajit Pawar : शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघावर अजितदादांनी दावा ठोकला. त्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना (Amol Kolhe) आव्हान देत नवा पर्याय देणार आणि उमेदवार निवडूनही आणणार असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आज सकाळीच अजित पवार मतदारसंघात दाखल झाले. मी काल जे काही सांगितलं तेच फायनल अशा शब्दांत ठणकावलंही. त्यानंतर आता खासदार कोल्हे सुद्धा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाआधी त्यांनी शरद पवारांची भेट घेत चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक शब्दांत अजितदादांना इशाराही दिला. बात निकली है तो दूर तक जाएगी अशा शब्दांत कोल्हेंनी इशारा देत जास्त बोलणं मात्र टाळलं.

याआधी अजित पवार यांनी काल पुणे दौऱ्यावर असताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच त्यांचे नाव न घेता शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर बरे झाले असते. दीड वर्षापूर्वी तो खासदार मला राजीनामा द्यायचा आहे, म्हणत माझ्याकडे आला होता. पण त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचे रान केले होते. त्यांना आणि मला खासगीत बोलवा. आता त्यांचे सगळे चाललेले आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते, अशी टीका केली होती.

दादांनी केंद्राला दरारा दाखवून निर्यातबंदी उठवावी; पवारांच्या भेटीनंतर कोल्हेंचाही बदलला ‘मूड’

अजित पवार यांच्या याच टीकेवर पत्रकारांनी कोल्हेंना प्रश्न विचारला. तसेच दीड वर्षांपूर्वी तुम्ही खरंच राजीनामा देण्यासाठी गेला होतात का असे विचारले. त्यावर कोल्हे म्हणाले, बात निकली है तो दूर तक जाएगी. पण मी त्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. त्यामुळे यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. दादांनीही नेहमीच माझं कौतुक केलं आहे. त्यामुळे त्यांनी आता एक विधान विरोधात केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही. यासंदर्भात मी त्यांच्याशी बोलेन.

मी 2019 मध्ये शिरूर मतदारसंघातून निवडून आलो त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मोठी मदत केली होती. मी त्यावेळी जिथे होतो तिथेच आजही आहे. ज्यांनी भूमिका बदलली त्यांनाच आता विचारा. खासगीत जी चर्चा होत असते ती सार्वजनिक करू नये. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी खासगीतील चर्चा काही प्रमाणात सार्वजनिक केली असली तरी मी तसं करणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube