‘नवीन मित्र आल्यानं ताकत वाढते’; अजितदादा-शरद पवारांच्या भेटीवर नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान
पुणे : पुण्यात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. भाजपने शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा दावा कॉंग्रेस नेते पृथ्वीराज यांनी केला. तर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार हे शरद पवारांनी सोबत घेऊ शकले, तरच त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळेल, असा दावा केला. दरम्यान, यावर आता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाष्य केलं. एखादा नवीन मित्र आला तर शक्ती वाढते, असं विधान त्यांनी केलं.
आज पुण्यात नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना शरद पवार आणि अजित भेटीवरून जे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की, राजकारणात जर-तरला फारसं महत्व नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात शरद पवारांचा लौकीक आहे. त्यांना सल्ला देण्याइतकी मी मोठी नाही. पण, जशा तुमच्या पंधरा वाहीन्या काम करत असतील, आणि आणखी एखादी नवीन वाहिनी आली तर तुमची शक्ती वाढते. तसं नवीन मित्र सोबत आले की, आमचीही शक्ती वाढते, असं गोऱ्हे यांनी सांगितलं.
Ahmednagar Crime : गरोदर पत्नीसह सासूवर पहारीने वार करुन खून, फरार जावयाची आत्महत्या
वडेट्टीवार यांनी अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यासंदर्भात गोऱ्हे यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, वडेट्टीवार यांना अजित पवार हे त्यांच्या मनातील मुख्यमंत्री असावेत असं वाटत असेल. त्यामुळे ते उल्लेख करत असतील, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
ज्यांच्यावर ७० हजार कोटीचा आरोप केला त्यांना सरकारमध्ये घेतलं, या उद्धव ठाकरेंच्या आरोपाविषयी गोऱ्हे यांनी सांगितलं की, ठाकरे राजा आहेत आणि मी प्रजा आहे. त्याच्यावर मी कसे बोलणार? असं कौतुक करत यावर जास्त बोलणं टाळलं
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सेनेच्या १२ आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला. पण ठाकरेंनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला. तर उदय सामंत यांनी हा दावा फेटाळला. याबाबत गोऱ्हे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मी उपसभापती आहे. कोण कुणाशी पाठीमागं काय बोलतं, हे मला माहिती नाही. यााबाबत मला माहिती नाही, असं म्हणतं त्यांनी याविषयावर भाष्य करणं टाळलं.