विखे घराण्याची लेक खासदार ! नीला अशोक विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री

Nila Vikhe Patil: दिवगंत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांची नात व शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे यांची मुलगी निला या खासदार झाल्या आहेत.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Nila Ashok Vikhe Patil

Nila Vikhe Patil : दिवगंत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांची नात व शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे यांची मुलगी निला या खासदार झाल्या आहेत. त्यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री झाली आहे. 41 वर्षीय निला ( Nila Vikhe Patil) यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. 13 सप्टेंबर रोजी स्वीडनच्या 349 सदस्यांसाठी मतदान झाले होते. शनिवारी झालेल्या मतमोजणीत निला विखे यांचा दणदणीत विजय झाला आहे.

निला विखे पाटील या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात आहेत. मला आशा आहे की माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटेल. मी 15 वर्षांची असताना त्यांनी मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला सांगितला होता, अशी भावनिक प्रतिक्रिया निला यांनी दिली आहे. नीला यांनी यापूर्वी स्वीडनच्या तत्कालीन पंतप्रधान स्टेफान लोफवेन यांच्या कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी अर्थव्यवस्था, कर आणि गृहनिर्माणाशी संबंधित विषयांवर काम केले होते. त्यांची स्टॉकहोम महानगरपालिकेच्या परिषदेतही निवड झाली होती.

ग्रीन पार्टीच्या सक्रीय सदस्य
नीला या ग्रीन पार्टीच्या सक्रिय सदस्य आहेत. स्टॉकहोम ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीच्या सदस्य आहेत. त्यांनी ग्रीन पार्टी, स्वीडिश यंग ग्रीन्स, ग्रीन पार्टी गोथेनबर्ग आणि ग्रीन स्टुडंट्स ऑफ स्वीडनसह विविध संघटनांमध्ये काम केले आहे. त्या ग्रीन पार्टी स्टॉकहोमच्या कार्यकारी समितीच्याही सदस्य राहिल्या आहेत.

स्वीडनमध्ये जन्म
स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला यांनी त्यांच्या बालपणीचा काही काळ लोणी येथे घालवला आहे. त्यानंतर पुन्हा स्वीडनमध्ये गेल्या. नीला यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास करत पदवी, तसेच एमबीए केले आहे. त्यांचे वडील अशोक विखे हे विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष असून, शिक्षणसंस्था चालवितात. तर निला यांचे चुलते राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत.

ग्रीन पार्टी प्रमुख विरोधी पक्ष
स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत डाव्या विचारांच्या विरोधी पक्षांना निसटते बहुमत मिळाले आहे. स्वीडनच्या निवडणूक प्राधिकरणानुसार, चार विरोधी पक्षांनी मिळून 349 पैकी 176 जागा जिंकल्या, तर सत्ताधारी पुराणमतवादी आघाडीचे चार पक्ष किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांना 173 जागा मिळाल्या. ग्रीन पार्टी हा प्रमुख विरोधी पक्ष असून पर्यावरण संवर्धन, अक्षय ऊर्जा आणि हरित राजकारणावर त्यांचा भर आहे. या निकालानंतर पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

follow us