‘आम्ही फ्लेक्स लावले का? फटाके वाजवले का?’; नीला विखेंच्या आरोपांवर सुजय विखे पाटलांचा पलटवार
Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil: नीला विखेंच्या स्वीडनच्या संसद निवडीवरून सुजय विखेंनी श्रेयवादाचे आरोप फेटाळत आपली भूमिका स्पष्ट केली.
Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil: स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाल्यानंतर नीला विखे पाटील (Nila Vikhe) आणि विखे पाटील कुटुंबातील राजकीय वादाला आता नवं वळण मिळालं आहे. नीला विखे यांनी गेल्या काही वर्षांपासून कुटुंबातील काही सदस्यांशी आपला संपर्क नसल्याचं सांगत, आपल्या राजकीय यशाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली होती. त्यावर माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी प्रतिक्रिया देत, या विषयाला विनाकारण राजकीय रंग दिला जात असल्याचं म्हटलं आहे.
विखे घराण्याची लेक खासदार ! नीला अशोक विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री
नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत निवडून आल्याची माहिती सुरुवातीला आपल्याला नव्हतीच, असं सुजय विखे यांनी सांगितलं. आपण कुटुंबातील व्यक्ती खासदार झाल्याचा आनंद व्यक्त केला, एवढंच आपलं म्हणणं होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्या मते, महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न असताना कुटुंबातील विषयावर एवढी चर्चा होणं आश्चर्यकारक आहे. नीला विखे यांनी स्वीडनमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर यश मिळवलं आहे, तर आपण महाराष्ट्रात आपल्या कामाच्या जोरावर राजकारण करत आहोत. त्यामुळे त्यांच्या यशाचं श्रेय घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असा युक्तिवाद सुजय विखे यांनी केला.
‘कुटुंबातील व्यक्ती मोठी झाली तर आनंद व्यक्त करायचा’
कुटुंबातील संबंधांबाबतही सुजय विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संपर्क नसला तरी कुटुंबातील एखादी व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचली, तर तिच्याबद्दल चांगली भावना व्यक्त करणं हा संस्कार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा सुसंस्कृतपणा बाळासाहेब विखे पाटील यांनी शिकवल्याचंही सुजय विखे म्हणाले.
निला विखेंवरून लंके म्हणाले कालपर्यंत ओळख न देणाऱ्यांनी… स्वीडन कुठं ते माहित नाही विखेंचा टोला
आपण नीला विखे यांच्या निवडीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला नाही, असा दावा करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या निवडीची माहिती देण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली का, फटाके वाजवले का, फ्लेक्स लावले का किंवा जाहीर सत्कार आयोजित केला का, असा सवाल सुजय विखे यांनी केला.
कुटुंबातील मतभेदांचा विषय सार्वजनिक चर्चेचा आणि राजकीय मुद्दा बनवण्यापेक्षा तो आता थांबवला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.