Sanjay Raut : फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य, राऊतांचा निशाणा

Sanjay Raut : फडणवीस  हे जगातील दहावे आश्चर्य, राऊतांचा निशाणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut )  यांनी भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadavis )  यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोठा स्फोट केला होता. पहाटेचा अजित पवारांसोबतचा ( Ajit Pawar )  शपथविधी हा शरद पवारांशी बोलून झाला होता, असे ते म्हणाले होते. यावर राऊतांनी पलटवार केला आहे. पहाटेच्या शपथविधीने फडणवीसांना अजूनही धडकी भरते. त्यांनी आपल्यावर उपचार करुन घ्यावेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच मला अटक करण्याचा मविआ सरकारने प्रयत्न केला होता, असे देखील फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, फडणवीसांनी अशी कोणती चूक केली होती की त्यांना अटक होण्याची भिती वाटते आहे. तसेच फडणवीसांचे अजित पवारांसोबतचे सरकार जर शरद पवारांच्या संमतीने असते तर टिकले असते, असे राऊत म्हणाले आहेत.

फडणवीस हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी आमच्या सोबत विश्वासघात केला. आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा त्यांनी शब्द दिला होता. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले होते. पण त्यांनी ते पाळले नाही, असे राऊत म्हणाले.  तसेच फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य आहेत. जगात सात आश्चर्य आहेत. दोन आश्चर्ये दिल्लीत बसली आहेत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना देखील टोला लगावला आहे.

दरम्यान आत्ताच झालेल्या शिक्षक व पदवीधरच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. आता कसबा व पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत देखील भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल. भाजपने शिंदे गटाची टेस्ट्युब बेबी आपल्या मांडीवर बसवली आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर देखीन निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube