डिलिमिटेशनवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत संभ्रम? आव्हाड म्हणाले पाठिंबा, तर निलेश लंके म्हणतात, ‘पाठिंबा नाही!’
Sharad Pawar NCP Delimitation Bill: देशभरात सध्या मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाची चर्चा सुरू आहे.
Sharad Pawar NCP Delimitation Bill: देशभरात सध्या मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाची चर्चा सुरू आहे. संसदेचे अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून लोकसभेत, तर 3 डिसेंबरपासून राज्यसभेत सुरू होणार आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही आपापल्या भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले. मात्र, पक्षाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केल्याने पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
खासदार निलेश लंके यांनी डिलिमिटेशन विधेयकाबाबत सावध भूमिका घेतली आहे. विधेयकाचा मसुदा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे त्यातील तरतुदींचा अभ्यास केल्यानंतरच पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा दिल्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, असेही लंके म्हणाले.
संसदेत विधेयक मांडल्यानंतर त्याचा मसुदा वाचून त्यात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत, हे तपासले जाईल. त्यानंतरच पक्षाची भूमिका ठरवण्यात येईल, असे लंके यांनी सांगितले. विधेयकाबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्यास तो योग्य आणि निर्णायक असावा, यासाठी पक्षाने सर्व खासदारांना संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचा दाखला देत डिलिमिटेशनला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. मतदारसंघ पुनर्रचना ही घटनात्मक प्रक्रिया असून ती आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
‘आंदोलनासाठी आलेल्या देणग्यांचा हिशोब कुठे?’; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंना थेट सवाल!
शरद पवार यांची भूमिका हीच आपली भूमिका असल्याचे सांगतानाच, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या आठ खासदारांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल, असेही आव्हाड म्हणाले. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा पक्षाचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले होते.
मात्र, आव्हाड यांच्या विधानानंतर निलेश लंके यांनी विधेयकाचा मसुदा पाहिल्याशिवाय पक्षाची भूमिका ठरलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका नेमकी काय असणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.